सोलापूर : अपघातातील मृत वारकऱ्यांची ओळख पटली; कुटुंबियांना पाच लाख रुपयांची तातडीची मदत

पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत चारचाकी गाडी घुसल्याने भीषण अपघात
Pandhrpur Accident
Pandhrpur AccidentMumbai tak

सांगोला : पंढरपूरला कार्तिकी यात्रेसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत चारचाकी गाडी घुसल्याने भीषण अपघात झाला. सोमवारी संध्याकाळी सांगोला तालुक्यातील जुनोनी बायपास जवळ झालेल्या या अपघातात ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत.  जखमींवर सांगोला येथे उपचार सुरु आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथून ही दिंडी निघाली होती.

दरम्यान, मृतांमध्ये पाच महिला, एक पुरूष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. शारदा आनंदा घोडके (40), सुशीला पवार, सुनिता सुभाष काटे (55), शांताबाई जयसिंग जाधव (55), रंजना बळवंत जाधव (50), सर्जेराव श्रीपती जाधव (45), गौरव पवार (सर्वजण रा. जठारवाडी ता करवीर जि.कोल्हापूर) अशी मृत वारकऱ्यांची नाव आहेत.

तर अनिता गोपीनाथ जगदाळे (60), अनिता सरदार जाधव (55), सरिता अरुण सियेकर (45), शानुताई विलास सियेकर (35) सुभाष केशव काटे (67) अशी जखमींची नाव आहेत. याशिवाय गाडीचालक तुकाराम दामु काशिद (रा.सोनद ता. सांगोला) आणि दिग्विजय मानसिंग सरदार (रा.पंढरपुर ता.पंढरपूर) हे दोघेही जखमी आहेत.

मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा :

वारकऱ्यांच्या या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मिरज - पंढरपूर मार्गावर भीषण अपघात :

कार्तिकी वारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जठारवाडी येथून ३२ वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरला निघाली होती. ही दिंडी सोमवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास मिरज - पंढरपूर मार्गावर सांगोला तालुक्यातील जुनोनी बायपास येथे पोहचली होती.

त्यावेळी मिरजेकडून भरधाव वेगाने येणारी MH 12 DE 7938 हि टाटा नेकसोन ही चारचाकी गाडी दिंडीमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. ही धडक इतकी जोरात होती की वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन गाडी थांबली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त गाडी सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in