
जयपूर : मध्य प्रदेशानंतर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा पुढचा मुक्काम राजस्थानमध्ये असणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारीही सुरु आहे. मात्र राजस्थान काँग्रेसमधील सध्याच्या वातावरणामुळे दिल्लीतील काँग्रेस हायकमांड टेन्शनमध्ये आले आहे. या वातावरणाचा परिणाम येत्या काळात भारत जोडो यात्रेवर व्हायला नको यासाठीही हायकमांडकडून प्रयत्न केले जात आहेत.
काही दिवसांपूर्वीच राजस्थान काँग्रेसची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे बडे नेते सचिन पायलट दोघेही उपस्थित होते. मात्र या भेटीत दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं संभाषण झालं नाही. यावरुन गेहलोत-पायलट यांच्यातील वैयक्तिक संबंधांमध्ये अद्यापही कटूता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत जोडो यात्रा ५ डिसेंबरला राजस्थानमध्ये पोहोचत आहे. त्यापूर्वी पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल जयपूरला जाऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. २९ नोव्हेंबर रोजी यात्रेशी संबंधित एका समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री गेहलोत आणि सचिन पायलटही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत वेणुगोपलच या नाराजीवर काही तोडगा काढणार का? याकडे सर्व काँग्रेस नेत्यांचं लक्ष लागलं आहे.
राजस्थानमध्ये गेहलोत मुख्यमंत्री झाल्यापासूनच गेहलोत-पायलट यांच्यातील संबंध तणावाचे राहिले आहेत. सुरुवातीची अडीच वर्ष संपल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर दावा सांगतं पायलट यांनी बंड पुकारलं. मात्र ते काही काळातच शांतही झालं. परंतु त्यानंतर गेहलोत यांनी पायलट यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही.
गेहलोत यांनी पायलट यांच्या नावालाही तीव्र विरोध केला होता. गेहलोत यांनी पायलट यांना गद्दार म्हणतं ते कधीही राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, असे म्हटले होते. गेहलोत म्हणाले होते की, ज्याने बंड केलं आहे आणि ज्याला गद्दार ठरवलं आहे, अशा व्यक्तीला आमदार कसे स्वीकारू शकतात. तो नेता मुख्यमंत्री कसा होणार? अशा व्यक्तीला आमदारही मुख्यमंत्री कसे काय स्वीकारू शकतात? माझ्याकडे पुरावा आहे की राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी आमदारांना प्रत्येकी 10 कोटी रुपये वाटण्यात आले होते.
अशोक गेहलोत यांच्या आरोपांना सचिन पायलट यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते, 'मी अशोक गेहलोत यांचे आरोप ऐकले. यापूर्वीही त्यांनी माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. असे खोटे आणि निराधार आरोप करण्याची आज गरज नाही. आज आपल्याला पक्ष कसा मजबूत करता येऊ शकतो याचा विचार करण्याची गरज आहे. गेहलोत ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत, असेही ते म्हणाले होते. माझ्यावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप करण्याचा सल्ला त्यांना कोण देत आहे हे मला माहीत नाही.