Eknath Khadse : ४०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; अधिकाऱ्यांचं पथक जळगावमध्ये

Shinde Government ने घेतली घोटाळ्याच्या आरोपांची दखल; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आदेश
Eknath Khadse
Eknath KhadseMumbai Tak

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील ४०० कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यांच्या आरोपांची दखल शिंदे सरकारने घेतली आहे. यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशानुसार, पुढील तपासासाठी भूविज्ञान गौण खनिज विभागाचे एक पथक मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहे. विधिमंडळात मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर ४०० कोटींच्या गौण खनिजाचे उत्खनन घोटाळ्याचा आरोप लक्षवेधीच्या माध्यमातून केला आहे.

काय आहेत एकनाथ खडसे यांच्यावर आरोप?

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावावर सातोडमध्ये जवळपास 33 हेक्टर 41 आर जमीन खरेदी करण्यात आली. हे संपूर्ण शिवार शालेय कामासाठी बिनशेती परवाना म्हणजेच (NA) करून घेण्यात आले होते. पण जानेवारी २०१९ ला आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्‍यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली.

यामुळे महसूल खात्याच्या आशीर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. नंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. १० हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती मात्र तिथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजांचं उत्खनन करण्यात आलं. हे गौण खनिज महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी वापरलं आणि यामधून ४०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

दरम्यान, याच तक्रारीची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घेतली असून भू विज्ञान आणि गौण खनिज विभागाच्या वतीने प्रादेशिक विभाग कोल्हापूर यांना तपासणी, सदर जमिनीची मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार भूविज्ञान गौण खनिज विभागाचे पथक मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले असून या पथकाने या जमिनीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहे. पुढील काही दिवस मोजणी आणि तपासणीची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in