राहुल गांधींविरोधात ठाणे पोलिसांकडे गुन्हा दाखल, वीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी कारवाई

वीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
Fir Filed Against Congress Leader Rahul Gandhi In Thane Police Station
Fir Filed Against Congress Leader Rahul Gandhi In Thane Police Station

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो या यात्रे दरम्यान वीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणा आता ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वीर सावरकरांविरोधातल्या वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असा आरोप डोंगरे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या मातीत आम्ही आमच्या महापुरूषांची बदनामी सहन करणार नाही असंही डोंगरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या भूमिकेला शिंदे गटानेही पाठिंबा दिला आहे.

राहुल गांधी यांच्या या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ठाण्यात निषेध मोर्चाही काढला होता..पोलिसांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनीही आज मोर्चा दरम्यान केली होती. त्यानंतर संध्याकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस नक्की काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.

वीर सावरकर यांच्याबाबत काय म्हणाले होते राहुल गांधी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत हे कुठेही दिसले नाहीत. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात लढा दिला. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं.

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत. हे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in