Ajit Pawar: ‘गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबरला नसतो’, अजितदादांनी सांगितलेला ‘तो’ किस्सा जसाच्या तसा…
Ajit Pawar on Gopinath Munde: गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस हा शरद पवारांच्या वाढदिवसावरून साजरा केला जातो. 12 डिसेंबर हा मुंडेंचा खरा वाढदिवस नव्हता. असा दावा अजित पवारांनी केला होता. वाचा तो नेमका किस्सा जसाच्या तसा..
ADVERTISEMENT

Gopinath Munde and Sharad Pawar Birthday: मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज (12 डिसेंबर) पुन्हा चर्चेत आले आहेत. अजित पवारांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा 83 वा वाढदिवस आहे. पण अजित पवारांनी सोशल मीडियावर कुठेही शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावला आहेत. तर दुसरीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त अजित पवारांनी आवर्जून ट्विट केलं आहे. पण काही वर्षांपूर्वी स्वत: अजित पवारांनी असं म्हटलं होतं की, गोपीनाथ मुंडे यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस नसतोच. त्यांनी शरद पवारांच्या वाढदिवसावरून आपला वाढदिवस साजरा करणं सुरू केलं होतं. (gopinath munde birthday is not on 12th december what exactly did ajit pawar said that time sharad pawar birthday)
आता हा नेमका किस्सा काय आहे आणि त्यावेळी अजित पवार हे गोपीनाथ मुंडेंच्या वाढदिवसाच्या तारखेबाबत नेमकं काय म्हणाले होते हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
हे ही वाचा>> Sharad Pawar : “प्रिय बाबा…”, पवारांच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
‘शरद पवारांच्या वाढदिवसावरून साजरा गोपीनाथ मुंडे आपला वाढदिवस…’
2017 साली अजित पवारांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या वाढदिवसाबाबत मोठं विधान केलं होतं.
अजित पवार म्हणालेले की, ‘मुंडे साहेब आणि शरद पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी नाही.. मुंडे साहेबांची 12-12 तारीख नाही. मुंडे साहेबांची तारीख आई-वडिलांना माहिती नव्हती, मुंडे साहेबांना पण माहिती नव्हती. जुन्या तारखा काढा.. कदाचित ती 1-6 असेल.
कारण शाळेत अॅडमिशन घेताना तशी तारीख टाकली असेल. मला धनंजय मुंडेंनी स्वत: सांगितलं की, पूर्वी चर्चा घरात झाली आणि मुंडे साहेबांचा वाढदिवस कधी आहे. आपण कधी साजरा केला पाहिजे.. त्यावेळी पवार साहेबांचं वलय एवढं होतं महाराष्ट्रात होतं.. मग तिथे चर्चा अशी झाली..
मी तुम्हाला स्पष्ट सांगतो.. मी अजिबात खोटं बोलणार नाही.. स्वत: धनंजय मुंडेंनी मला सांगितलेलं.. मग 12-12 तारीख काढलेली. त्या दिवशी शरद पवारांचा वाढदिवस जोरात साजरा होतो. तर तीच तारीख आपण काढूया.. मग आपलाही वाढदिवस त्या दिवशी साजरा होईल.
तुम्ही माहिती काढा.. मुंडे साहेब राजकारणात कधी आले.. 80 साली आले.. 80 सालापासून मुंडे साहेबांचे 12-12 जी पुढची तारीख असेल ते कधी साजरे झाले त्याचे रेकॉर्ड काढा.. त्यामुळे त्यांचा 12-12 वाढदिवस नाही.
मात्र, देवेंद्रजी आणि माझा 22-7 वाढदिवस आहे. फक्त माझं 1959 साल आहे. त्यांचं साल किती ते तुम्हाला माहिती. पण ते मला ज्युनिअर आहेत.
हे ही वाचा>> Devendra Fadnavis: ‘सत्ता येते आणि जाते, पण…’, फडणवीसांचं अजितदादांना खुलं पत्र, महाराष्ट्रात मोठी खळबळ!
असा किस्साच अजित पवार यांनी यावेळी सांगितला होता. म्हणजेच अजित पवार यांनी त्यावेळी असा दावा केला होता की, गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस 12 डिसेंबरला नसतो. केवळ शरद पवार यांच्या वाढदिवसावरून त्यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती.
स्वकर्तृत्वानं राजकारण आणि समाजकारण वर्तुळात स्वतःची एक दिलदार नेतृत्व अशी ओळख निर्माण करणारे माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/J2EnkuCU6D
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2023
मात्र, आज अजित पवारांनी स्वत: गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवी चर्चा सुरू झाली आहे.