
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नेस्को मैदानात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली. बाप पळवणारी अवलाद महाराष्ट्रात फिरते आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कडाडून टीका केली आहे. आजचं उद्धव ठाकरेंचं भाषण हे दसरा मेळाव्याची सेमी फायनल होती अशीही चर्चा आहे. तसंच व्यासपीठावर आल्या आल्या दसरा मेळावा शिवतीर्थावरच घेणार अशीही गर्जना उद्धव ठाकरेंनी केली.
व्यासपीठावर आल्यानंतर बघितलं की, आमचे वडील आहेत ना जागेवर? कारण मुलं पळवणारी टोळी ऐकली आहे, पण बाप पळवणारी अवलाद सध्या महाराष्ट्रभर फिरते आहे. मला आश्चर्य वाटतं की, एवढी वर्षे आपण सगळ्यांनी यांना सत्तेचं दूध पाजलं. मानसन्मान दिला आणि त्यांच्या तोंडाची आता गटारगंगा उघडली आहे. जाऊदेत त्यांच्याबद्दल मी फार काही बोलत नाही तुम्ही सगळे त्यांना उत्तर देत आहात.
मुंबईवर गिधाडं फिरू लागली आहेत. लचके तोडणारी अवलाद आहे ती गिधाडांची. ती गिधाडं फिरू लागली आहेत. मुंबई बळकावयची आहे, मुंबई गिळायची आहे. हे काही आजचं नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचून मोठे झालो आहोत. त्यावेळी अनेक आदिलशाह, निजामशाह चालून आले होते. त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शाह मुंबईत येऊन गेले. काय बोलले? शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहित नाही इथे समोर बसलेली गवताची पाती नाहीत तर तलवारीची पाती आहेत. तुम्ही जमीन दाखवायचा प्रयत्न कराच तुम्हाला आम्ही आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही.
एक गोष्ट लक्षात घ्या वृत्तीमध्ये कसा फरक असतो. गिधाडं हा शब्द मी मुद्दाम वापरला. निवडणूक आल्यानंतर तुम्हाला मुंबई दिसते आहे. मुंबईवर जेव्हा संकट येतं तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? मुंबई ही तुमच्यासाठी केवळ जमीन असेल. आमच्या सगळ्यांसाठी ही मातृभूमी आहे. ही नुसती जमीन नाही हे लक्षात ठेवा. मुंबादेवी ही आमची आई आहे. जो आमच्या आईवर वार करायला येईल त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
दुर्दैवाने आईला गिळणारी अवलादसुद्धा आहे. आईला गिळायला निघालेली अवलाद म्हणजे माणसं आहेत की जनावरं? ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं त्या शिवसेनेवर उलटले. सुरत २३२ किमी लांब आहे. ढोकळा खायला किती लांब जावं लागलं यांना. मुंबईतल्या वडापावच्या मिरचीच्या ठेचा तुम्हाला एवढा जास्त झोंबला का? असाही प्रश्न विचारत एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.