NCP: जयंत पाटील, आव्हाडांबाबत अजित पवारांनी घेतला प्रचंड मोठा निर्णय
जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्यात यावं याबाबतचं पत्र हे विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलं आहे. अशी माहिती स्वत: अजित पवार यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Political News in Marathi: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कारण की, अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासह 9 जणांना अपात्र करावं अशा आशयाचं पत्र हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं. मात्र, दुसरीकडे अजित पवारांनी आज (3 जुलै) पत्रकार परिषद घेत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याबाबत घेतलेल्या मोठ्या निर्णयाची माहिती दिली. (letter given assembly speaker jayant patil jitendra awhad should be disqualified dcm ajit pawar ncp maharashtra politics update)
काल (2 जुलै) रात्री 12 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांनी घोषणा केली होती की, अजित पवार यांनी केलेली कृती पक्षशिस्तीचा भंग आहे. त्यामुळे त्यांच्यासह 9 जणांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच जयंत पाटलांनी अशीही घोषणा केली होती की, विरोधी पक्ष नेतेपदी आणि प्रतोदपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पण असं असताना आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी असं सांगितलं की, प्रफुल पटेल यांनी कार्याध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं असून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय अजित पवारांनी हे देखील सांगितलं की, ‘जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरविण्यात यावं याबाबतचं पत्र हे आधीच विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे.
पाहा पत्रकार परिषदेत अजित पवार नेमकं काय म्हणाले:
‘मीडियामध्ये मी वाचलं की, 9 जणांवर अपात्रतेची कारवाई करावी.. असं बोलण्यात आलेलं आहे. मी आपल्या सांगू इच्छितो.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि पक्षाने मला विधीमंडळात नेता केलं आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे कालच आम्ही तशा पद्धतीने पत्र दिलं आहे.’