''हे वागणं बरं नव्हं, कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही'' असं अजित पवार का म्हणाले?

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेत प्रश्नांचा जोरदार भडिमार केला.
Maharashtra Assembly Monsoon Session 2022 Ajit Pawar Speech
Maharashtra Assembly Monsoon Session 2022 Ajit Pawar Speech

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेत प्रश्नांचा जोरदार भडिमार केला. यामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विकास कामांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. त्यांनी राज्यातील अनेक विषयांवरती सभागृहाचे लक्ष वेधले. विकास कामांच्या निधीवरुन अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

अजित पवार सभागृहात काय म्हणाले?

''मुख्यमंत्री महोदय आताच्या पुरवणी मागण्यांमध्ये शिंदे गटाच्या ४० लोकांना ५०-५० कोटींची कामं दिली आहेत. भाजपने पण त्यांच्या आमदारांना ५०-५० कोटींची कामं दिलेली आहेत. माझं म्हणणं एवढच आहे असा दुजाभाव करु नका. आपणच मंत्रिमंडळामध्ये एकत्र असाताना आपण मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणं हे वागणं बरं नव्हं, कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही, सगळे दिवस सारखे नसतात, कधी आपल्याला एकत्र यावं लागेल सांगत येणार नाही त्यामुळे असं करु नका'' असं अजित पवार विधानसभेत म्हणाले त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

पांढऱ्या दाढीचा देशावर प्रभाव, छगन भुजबळांचा रोख कुणाकडे?

आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असताना सभागृहात विविध विषयांवरती चर्चा सुरु आहे. दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार टोलेबाजी केल्याचं पहायला मिळालं. देशात पहिल्यांदाज दाढीवाला मुख्यमंत्री झाल्याचे त्यांनी म्हटलं. माझी दाढी पांढरी आहे, तर एकनाथ शिंदे यांची दाढी काळी आहे. मात्र सध्या देशात पांढऱ्या दाढीवाल्यांचाच प्रभाव असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. त्याचा उच्चार अजित पवार यांनी पून्हा भाषणात केला.

महागाईच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

देशात आणि राज्यात वाढत्या महागाईने विरोधी पक्ष ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. पेट्रोल-डिझेल च्या वाढत्या किंमतीचा विषय आज सभागृहात देखील गाजला. वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. महागाई वाढतच आहे. वाढत्या महागाईवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारव जोरदार टीका केली आहे. आम्ही गद्दार नव्हे खुद्दार असे उत्तर बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना दिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in