तानाजी सावंत यांना जाहीरपणे न बोलण्याच्या सुचना? सर्वच प्रश्नांवर मौनाची भूमिका

प्रत्येक प्रश्नाला ‘मला माहिती नाही’ असेच उत्तर
Tanaji sawant file photo
Tanaji sawant file photoMumbai Tak

मुंबई : मराठा आरक्षणाच्या वक्तव्यावरुन वादात सापडलेल्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना जाहीरपणे कुठेही कोणतेही भाष्य न करण्याच्या सुचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत का? असा सवाल आता विचारला जात आहे. याचे कारण माध्यमांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांबाबत सावंत यांनी मला माहित नाही असे उत्तर देऊन मौन बाळगणेच पसंत केले. ते बुधवारी संध्याकाळी पुण्यात बोलत होते.

तानाजी सावंत यांना पत्रकारांनी पक्षात काय सुरु आहे? याबाबत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला ‘मला माहिती नाही’ असेच उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरेंची सावली असलेले चंपासिंह थापा यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला आहे. या प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता ‘मी अजून बघितलंच नाही’ अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया सावंत यांनी दिली.

याशिवाय दसरा मेळाव्याबाबतच्या प्रश्नांवर बोलायलाही मंत्री सावंत यांनी टाळाटाळ केली. "दसऱ्याला फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच मेळावा होणार" असे उत्तर देत त्यांनी विषय संपविण्याचा प्रयत्न केला. अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी निवड करणारा ठराव केल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावरही मला काहीच माहीत नाही अस उत्तर त्यांनी दिले.

मराठा आरक्षणावरील वक्तव्यावरुन सावंत वादात :

मागील काही दिवसांपासून तानाजी सावंत सातत्याने त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडत आहेत. बीडमधील माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील वादग्रस्त टीकेनंतर त्यांनी मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हटल्याने सावतं वादाच्या केंद्रस्थानी आले. सावंत यांच्या या वक्तव्यावरुन समाज माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय मराठा समाजातील नेतेही सावंताविरोधात आक्रमक झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांकडून राजीनामा घ्यावा :

राठा आरक्षणावरून वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे. ज्याप्रमाणे जळगावमधील पोलीस निरीक्षकाने मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्याचे तात्काळ निलंबन केले तशीच कारवाई तानाजी सावंत यांच्यावर करावी अशी मागणी केली.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in