13 महिन्यांच्या संघर्षाचा कार्यक्रम CM शिंदेंनी 15 मिनिटात आटोपला : अंबादास दानवेंची टीका

एकनाथ शिंदेंनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोहळ्याला फक्त १५ मिनिटं दिली : अंबादास दानवे
Ambadas Danve
Ambadas Danve Mumbai Tak

औरंगाबाद : दिल्लीचे पात शहा येणार आहेत म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम 15 मिनिटात आटोपता घेतला. मराठवाड्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. ते औरंगाबादमध्ये शासकीय ध्वजारोहणानंतर बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शनिवारी सकाळी औरंगाबादमध्ये शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या सेनानींना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, प्रशांत बंब, हरिभाऊ बागडे हे सर्वजण उपस्थित होते.

औरंगाबाद येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री शिंदे हे हैदराबादला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमधील पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावरुनच अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले. ते म्हणाले, मराठवाड्यातील बरेच उद्योजक नाराज आहेत. उद्योजकांनी माझ्याकडे नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांची दखल घ्यावी. असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

दिल्लीचे पात शहा येणार म्हणून...

तसेच दिल्लीचे पात शहा येणार म्हणून मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम 15 मिनिटात आटोपता घेतला. मराठवाड्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतरही मराठवाड्याला स्वातंत्र होण्यासाठी एक वर्ष एक महिना दोन दिवस लागले आणि त्यांनी हा कार्यक्रम 15 मिनिटात आटोपत घेतला.

भाषणात केलेल्या घोषणा जुन्याच : अंबादास दानवे

तसेच भाषणात केलेल्या घोषणा या जुन्याच आहेत. मराठवाड्यातील कुठल्याही जिल्ह्यासाठी नवीन एखादी घोषणा केली नाही. मंजूर कामे नव्याने सांगितली. मराठवाडा रौप्य महोत्सव साजरा करत असताना मराठवाड्याचा मागासलेपणा घालवण्याची मोठी संधी. त्यासाठी वेगळं पॅकेज मराठवाड्याला घोषित करणे गरजेचे होते, असेही दानवे यांनी म्हटले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in