PM Modi Speech in Parliament : मोदींनी नेहरूंचं केलं कौतुक, काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अधिवेशनातील भाषण : पीएम मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरूंचे केले कौतुक. इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्रींच्या सरकारांच्या कार्याचा केला उल्लेख.
ADVERTISEMENT

PM Narendra Modi’s Speech in parliament special session : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसदेतील शेवटचं भाषण केलं. या भाषणात मोदींनी विविध मुद्दे आणि वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचाही गौरव केला. (PM Modi mentioned all the governments)
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्रीजींपासून ते अटलबिहारी आणि मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वांनी देशाला नवी दिशा दिली. आज प्रत्येकाची स्तुती करण्याची वेळ आली आहे. या सदनाला समृद्ध करण्यासाठी आणि देशातील सामान्य नागरिकांचा आवाज होण्यासाठी प्रत्येकाने काम केले आहे.”
“जेव्हा देशाने राजीवजी, इंदिराजी यांना गमावले, तेव्हा या सभागृहाने त्यांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली वाहिली. प्रत्येक अध्यक्षाने हे सभागृह सुरळीत चालवले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलेले निर्णय आजही संदर्भ बिंदू मानले जातात. मालवणकरजींपासून ते सुमित्राजींपर्यंत प्रत्येकाची स्वतःची शैली राहिली. प्रत्येकाने नियम आणि कायद्याच्या बंधनात हे सभागृह चालवले. आज मी त्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि सलाम करतो”, असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला कोणीही विसरू शकत नाही – पंतप्रधान मोदी
“एक दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला संपूर्ण जगात एका इमारतीवर नव्हता, तर एक प्रकारे तो आपल्या आत्म्यावर हल्ला होता. ती घटना हा देश कधीही विसरू शकत नाही. पण आज ज्यांनी दहशतवाद्यांशी लढताना आपल्या सदस्यांना वाचवण्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या त्यांनाही मी सलाम करतो. मी या सभागृहाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो”, अशा भावना मोदींनी संसदेवरील हल्ल्यातील शहिदांविषयी व्यक्त केल्या.










