Ramdas Kadam : ‘तुमचं पितळ उघड…’, कदमांचा घणाघात, कीर्तिकरांच्या फंडाबद्दल मोठा गौप्यस्फोट
Gajanan kirtikar vs ramdas kadam : गजानन कीर्तिकरांनी गद्दार असा उल्लेख केल्यानंतर रामदास कदम यांना संताप अनावर झाला. तुम्ही मुलासाठी शिंदेंच्या सेनेकडून लढवण्याची नौटंकी करत आहात, अशी घणाघाती टीका कदमांनी कीर्तिकरांवर केली.
ADVERTISEMENT

Ramdas Kadam vs Gajanan Kirtikar political war : ‘माझ्याविरोधातील निष्फळ प्रयत्न थांबावा. रामदास कदमांचा गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे’, या खासदार गजानन कीर्तिकरांच्या विधानाने रामदास कदमांचा पारा चांगलाच चढला. रामदास कदमांनीही कीर्तिकरांच्या प्रेसनोटचा समाचार घेत प्रत्युत्तर दिलं. नौटंकी करण्यासाठी निवडणूक लढवणार आहात, असा गंभीर आरोप करत कदमांनी मुंबई Tak शी बोलताना कीर्तिकरांच्या खासदार फंडाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.
रामदास कदमांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाबद्दल विधान केले होते. पक्षाशी बेईमानी होणार नाही याची काळजी घ्या. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असं कदम म्हणाले. कदमांच्या या विधानावर कीर्तिकरांनी त्यांना गद्दार असं संबोधलं. त्यामुळे कदमांना संताप अनावर झाला.
रामदास कदमांचं गजानन कीर्तिकरांना प्रत्युत्तर
गजानन कीर्तिकरांनी प्रेसनोटच्या माध्यमातून मांडलेल्या भूमिकेबद्दल रामदास कदम म्हणाले, “गजाभाऊ, तुम्ही देखील ज्येष्ठ आहात. आपल्या पक्षात दिवाळीमध्येच शिमगा होतोय. हे सगळं महाराष्ट्र बघतोय, याचं भान आपण ठेवलं पाहिजे, असं मला वाटतं. प्रेस नोट काढण्यापेक्षा एकनाथ शिंदे आपले प्रमुख नेते आहेत, त्यांच्याकडे गेला असता, तिथे आपण चर्चा केली असती तर विषय संपला असता.”
“निष्ठा शिकायची असेल तर रामदास कदमकडून शिका”
रामदास कदमांचा गद्दारीचा इतिहास मोठा आहे, असं कीर्तिकर म्हणालेले. त्यावर कदम म्हणाले, “मला एक गोष्ट खटकली की, रामदास कदमला तुम्ही गद्दार कसं म्हणू शकता? शिवसेनेच्या वाईट होण्यामध्ये जेव्हा नारायण राणे गेले, त्यावेळी डोक्याला कफन बांधून पक्षासाठी लढणारा एकमेव रामदास कदम होता. निष्ठा शिकायची असेल, तर रामदास कदमकडून शिका.”