Sanjay Raut : “बाळासाहेबांनी या कृत्याबद्दल शिंदेंची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारास गेले आहेत. शिवसेना आमचीच… बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच, असा डांगोरा ते रोज पिटत आहेत. आता काय?”, असा सवाल करत राऊतांनी शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यापासून महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार, खासदारांना ठाकरे गट वेगवेगळ्या मुद्द्यांवरून लक्ष्य करताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला आहे. “बाळासाहेबांनी या कृत्याबद्दल शिंदेंची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती”, असं राऊत म्हणालेत. राऊतांनी शिंदेंबद्दल विधान का केलंय, तेच बघूयात…
खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं. ट्विटमधून राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. या टीकेमागचं कारण आहे शिंदेंचा कर्नाटक दौरा! कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. प्रचार जोरात सुरू आहे. अशात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंही कर्नाटकात पोहोचले. शिंदे दोन दिवसांच्या दौऱ्यात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो आणि सभा घेणार आहेत.
संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर काय टीका केली?
खासदार राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये राऊत म्हणतात, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारास गेले आहेत. शिवसेना आमचीच… बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच, असा डांगोरा ते रोज पिटत आहेत. आता काय?”, असा सवाल करत राऊतांनी शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
“कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणतात महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकं उचापती आहेत, त्यांना आम्ही धडा शिकवू… आणि शिंदे त्याच बोम्मईंच्या पखाली वाहत आहेत. शिंदे व त्यांची टोळी सीमा भागात फिरकली नाही. उलट एकीकरण समितीच्या विरोधातील भाजपा उमेदवारांना खोके पाठवून मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला”, असं टीकास्त्र राऊतांनी डागलं.