Sanjay Raut : “मोदी बैठकीत म्हणाले, आता माझ्या नावावर मते मागू नका”
शिवसेना (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर टीका केली. 2024 मध्ये भाजपची सत्ता जाईल असे भाकित राऊतांनी केले आहे.
ADVERTISEMENT

Sanjay Raut vs Narendra Modi : भाजपने लोकसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केलंय. एनडीएतील मित्रपक्षांना जोडलं जात आहे. बैठकांवर बैठक सुरू आहे. पंतप्रधान मोदीही बैठका घेत असून, एका बैठकीबद्दल शिवसेनेना (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय.
संजय राऊतांनी रोखठोकमधून काही मुद्द्यावर भाष्य केलं आहे. ‘नेहरू वंशाचा ‘गांधी’ , 2024 च्या विजयाचे रणशिंग’, या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात राऊत म्हणतात, “राहुल गांधी पुन्हा संसदेत पोहोचले व अविश्वास ठरावाच्या चर्चेत त्यांनी जोरदार हल्ले केले. 9 ऑगस्टच्या क्रांतिदिनी नेहरू वंशातील एक ‘गांधी’ मोदी-शाहांच्या मनमानी सत्तालोलुपतेविरोधात उभा राहिलेला देशाने पाहिला. मोदी यांना 2024 ची निवडणूक सोपी राहिलेली नाही.”
“पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या मुठीतून सत्तेची वाळू सटकत आहे. 2024 पर्यंत त्यांची मूठ रिकामी झालेली असेल हे आता स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षाने संसदेतून काढले. त्यासाठी गुजरातच्या भूमीवरील न्याय यंत्रणा व कायद्याचा गैरवापर केला. तेच राहुल गांधी सरकारवरील अविश्वास ठरावाच्या वेळी संसदेत पोहोचले. अविश्वास ठरावावर ते खणखणीत बोलले. तेव्हा भाजप सदस्यांनी फक्त गोंधळ घालण्याचेच काम केले. राहुल गांधी हे आदल्या दिवशी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पोहोचले. सोबत सोनिया गांधी होत्या. मध्यवर्ती सभागृहात बसलेले भाजपचे सदस्य तेव्हा पळून गेले. राहुल गांधी जवळ आले व त्यांनी हस्तांदोलन केले तर ‘वर’पर्यंत वृत्त जाईल व नोकरी गमवावी लागेल हे भय आज दिल्लीत सर्वत्र आहे”, असं राऊतांनी म्हटलंय.
स्मृती इराणींवर टीकास्त्र
“राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी तावातावाने स्मृती इराणी उभ्या राहिल्या; पण त्यांच्याकडे एक मिश्किल कटाक्ष टाकत राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले. राहुल गांधींचा पराभव करून 2019 साली स्मृती इराणी निवडून आल्या, पण 2024 साली अमेठीची जनता चूक सुधारेल. प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवावी असे अनेकांचे आज मत आहे. प्रियंका गांधी यांच्याशी मोदी यांना मुकाबला करावा लागेल व निकाल काय लागेल ते कोणीच सांगू शकणार नाही. मोदी हे गुजरात व वाराणसी अशा दोन मतदारसंघांतून निवडणुका लढवतील, पण वाराणसी त्यांच्यासाठी सोपे राहणार नाही. देशाचे वातावरण आणि वारे पूर्ण बदलत आहेत”, असं भाष्य संजय राऊतांनी केलं आहे.