बाळासाहेबांचा शिवसेनाप्रमुख उल्लेख टाळला; उद्धव ठाकरेंचेही नाव गायब : राजकारण तापणार?

Balasaheb Thackeray - Uddhav Thackeray - CM Eknath Shinde : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानभवनात करण्यात येणार आहे.
Balasaheb Thackeray - Uddhav Thackeray - CM Eknath Shinde
Balasaheb Thackeray - Uddhav Thackeray - CM Eknath Shinde Mumbai Tak

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानभवनात करण्यात येणार आहे. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी हा सोहळा पार पडणार आहे. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली होती. दरम्यान, आता या सोहळ्याच्या कार्यक्रमपत्रिकेवरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

या कार्यक्रमपत्रिकेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनाप्रमुख असा उल्लेख टाळण्यात आला आहे. त्याऐवजी केवळ 'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण कार्यक्रमपत्रिकेमध्ये शिवसेना (UBT) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचे नाव कुठेही टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नुकताच झालेल्या अधिवेधनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबतची घोषणा केली होती. पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांचे तैलचित्र विधानसभेत बसवण्याची मागणी केली होती. ज्यावेळी राहुल नार्वेकरांनी विधानसभेत घोषणा केली त्यावेळी भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत शिवसेनाप्रमुख हा शब्द वापरणार की नाही असा प्रश्न केला होता. त्यावेळी कार्यक्रमावेळी योग्यरित्या नाव घेऊ असं नार्वेकर म्हणाले होते.

आता कार्यक्रमपत्रिका आल्यानंतर त्यातही शिवसेनाप्रमुख हा उल्लेख टाळण्यात आला आहे. त्याचबरोबर पत्रिकेमध्ये केवळ अंबादास दानवे, अजित पवार, नीलम गोऱ्हे यांची नावे टाकण्यात आलेली आहेत. परंतु उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. बाळासाहेबांच्या तैलचित्राबाबत देखील ठाकरेंच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तैलचित्र आणखी चांगलं साकारता आलं असतं असं आमदारांचे म्हणणं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in