संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलैला अटक करण्यात आली आहे
Shiv Sena MP Sanjay Raut's judicial custody extended by 14-days.
Shiv Sena MP Sanjay Raut's judicial custody extended by 14-days.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. कारण संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढली आहे. संजय राऊत यांना ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतल्या गोरेगावमधल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत मागचे ५० दिवसांपासून तुरुंगात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर तसंच कोठडीबाबत आज एकत्रित सुनावणी पार पडली.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना अटक

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने चार दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. १ हजार कोटींच्या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. मात्र आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही असं संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं. यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. तसंच तुम्ही आरोपपत्र देत नाही तोपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करत असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै ला उशिरा अटक

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलैला उशिरा अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ही अटक करण्यात आली. तेव्हापासून संजय राऊत हे ईडी कोठडीत होते. न्यायालयाने त्यांना दुसऱ्यांदा दिलेली ईडी कोठडी आज संपत असल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर यामध्ये सातत्याने वाढ होते आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही अडचणी वाढल्या आहेत कारण ईडीने त्यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं.

मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या पत्रा चाळ जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यावरून ईडीने या प्रकरणाचा मनी लाँडरिंगच्या अनुषंगाने तपास सुरू केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांचं नाव समोर आल्यानंतर ईडीने त्याची चौकशी सुरू केली होती.

संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी काय घडलं?

२० जुलै आणि २७ जुलैला समन्स बजावल्यानंतर संजय राऊत हे उपस्थित राहिले नाही. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं उपस्थित राहू शकत नाही, असं संजय राऊतांनी ईडी कार्यालयाला कळवलं होतं. दरम्यान, ३१ जुलै रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झालं. सकाळी पथक दाखल झाल्यानंतर राऊत यांना अटक होणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

३१ जुलैला दुपारी चार वाजेपर्यंत ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरीच होते. संसदेचं अधिवेशन सुरू असताना ईडी कार्यालयात घेऊन जाऊ शकत नाही, असं संजय राऊतांकडून ईडी अधिकाऱ्यांना सांगितलं जात होतं. संजय राऊतांच्या वकिलांनीही याचं कारणावरून ईडीच्या अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला. नऊ ते दहा तास चाललेल्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना भांडुप येथील निवासस्थानावरून ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर ३१ जुलैला रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in