ठाकरेंचे केसरकरांना ५ प्रश्न: सत्तांतरानंतर पहिल्यांदाच 'सामना'

Uddhav Thackeray |Deepak Kesarkar : सत्तांतरानंतर ठाकरे आणि केसरकरांमध्ये पहिल्यांदाच सामना झाला.
उद्धव ठाकरेंनी केसरकरांना सुनावलं
उद्धव ठाकरेंनी केसरकरांना सुनावलंMumbai Tak

नागपूर : शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर आज (गुरुवारी) पहिल्यांदाच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आमने-सामने आले होते. या दरम्यान ठाकरेंनी केसरकरांना काही प्रश्नही विचारले.

नेमकं काय घडलं?

आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या दालनात मंत्री दीपक केसरकर विधान परिषदेतील कामकाजासंदर्भात चर्चा करण्यासाठी आले होते. याचवेळी उद्धव ठाकरेही तिथं आले. शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे आणि केसरकरांमध्ये पहिल्यांदाच सामना झाला.

यावेळी ठाकरे यांनी केसरकर यांना जाबही विचारला. ठाकरे म्हणाले की, तुम्ही असे कसे काय इतके निर्दयीपणे वागू शकता?, आम्ही काय वाईट केलंय तुमचं?, काय कमी दिलं तुम्हाला? आमच्या चौकशा लावता?, कार्यालय ताब्यात घेता? असे सवाल विचारत नाराजी व्यक्त केली.

यापूर्वी प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे आले होते आमने सामने :

यापूर्वी जुलै महिन्यात बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आमने सामने आले होते. यावेळी दोघांनीही हस्तांदोलन केलं. मात्र या संभाषणात प्रकाश सुर्वे काहीही बोलू शकले नव्हते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले होते, एवढे जवळचे असून असं कराल असं वाटलं नव्हतं. काय सांगाल मतदार संघात? त्यादिवशी जेवण तयार ठेवलं होतं, आम्ही तुमच्याकडे येत होतो. असं कराल खरंच अपेक्षित नव्हतं. माझं तुमच्यावर खरोखर प्रेम होत. हे तुम्हाला पण माहित आहे. पण बघा आता विचार करा, पण मला स्वत:ला दु:ख झालं, असं म्हटले होते.

मुंबईचे कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरे नाराज?

शिवसेनेचे दोन गट (ठाकरे गट आणि शिंद गट) बुधवारी सायंकाळी मुंबई महापालिकेतील कार्यालयावरून भिडले. दोन्ही गटांमध्ये जोरदार राडाही झाला. त्यामुळे महापालिकेत तणाव निर्माण झाला होता. बुधवारी सायंकाळी खासदार राहुल शेवाळे, यशवंत जाधव, शितल म्हात्रे यांच्यासह शिंदे गटाचे नेते बीएमसीतील शिवसेनेच्या कार्यालयात गेले होते. हे कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in