भाजपशी जवळीक? अजित पवार नागपूरच्या वज्रमूठ सभेत भाषण करणार का?
नागपूरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेत अजित पवार भाषण करणार नसल्याची माहिती
ADVERTISEMENT

मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची आणि भाजप (BJP) ची जवळीकता वाढल्याच्या बातम्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पर्यायी सरकार देण्याची वेळ आल्यास त्यात अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तविली जात आहे. या बातम्या आणि चर्चांना खतपाणी मिळालं ते काही दिवसांपासूनच्या अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपला पुरक भूमिका. अशातच आता नागपूरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेत अजित पवार भाषण करणार नसल्याची माहिती आहे. (NCP Leader Ajit Pawar will not make a speech in the Mahavikas Aghadi public rally to be held in Nagpur)
महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेमध्ये एक सूत्र मांडण्यात आलेला आहे. त्या सूत्रानुसार प्रत्येक पक्षाकडून 2 वक्ते भाषण करतात. म्हणजे एकूण 6 जणांचं भाषण होतं. अशात नागपूरच्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काटोलचे आमदार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं भाषण होणार असल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील आणि विदर्भातील मोठे नाव, महत्वाचा चेहरा म्हणून देशमुख यांचं भाषण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांचं भाषण का नाही असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
अजित पवार पुन्हा भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी काय सांगितलं, राऊतांनी दिलं उत्तर
अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या भूमिका :
मागील काही दिवसांपासून अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या भूमिका भाजपला पुरक असल्याचं दिसून येत आहे. यात मग काँग्रेसने उपस्थित केलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिग्रीचा मुद्दा असो किंवा अदाणींच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी काँग्रेसला फटकारणं असो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा मुद्दा कसा गैर लागू आहे चुकीच्या पद्धतीने तो मुद्दा घेतला जातो त्या मुद्द्यात काही अर्थ नाही, अशा पद्धतीची भूमिका अजित पवार यांनी मांडली. त्यानंतर अजित पवार 17 तास नॉट रिचेबल होते. यावर त्यांनी पित्ताचा त्रास होतं असल्याने आराम करत असल्याचं सांगितलं होतं. त्याच दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जरंडेश्वर कारखाना प्रकरणात क्लिनचीट मिळाल्याच्या बातम्या आल्या होत्या.. याच सगळ्या घडामोडींमुळे अजित पवार यांचंं भाषण न होणं ही मोठी राजकीय घडामोड म्हणून पाहिलं जातं आहे.
मुंबई Tak बैठक: अजित पवार नॉट रिचेबल असताना कुठे होते?, फडणवीसांनी खरं काय ते सांगूनच टाकलं!
अजित पवार संशयाच्या फेऱ्यात :
दरम्यान, अजित पवार हे स्वतः संशयाच्या फेऱ्यात अडकल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांनी ‘मुंबई तक’सोबत बोलताना व्यक्त केलं. जोग म्हणाले, आधी ते १७ तास ते नॉट रिचेबल होते. त्यानंतर, दक्षिण मुंबईच्या एका हॉटेलमध्ये अजित पवार, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांची एक खाजगी बैठक झाल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. त्याचवेळी मुंबई तकच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केलं की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही नेते आमच्या संपर्कात आहेत आणि ते योग्यवेळी आमच्यासोबत येतील. त्यामुळे हे संशयाचं वातावरण तयार झालं आहे.