मोठी बातमी: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार पुन्हा बैठकीसाठी एकत्र! नेमक्या कोणत्या विषयावर झाली चर्चा?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे. या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली? याबाबत सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार पुन्हा बैठकीसाठी एकत्र!

'या' विषयावर झाली चर्चा...
Ajit Pawar and Sharad Pawar meeting: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये काका पुतण्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय पक्षात वेगवान घडामोडी घडत असताना अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील बैठकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट कोणत्याही राजकीय कारणासाठी नव्हे तर बारामती तालुक्यातल्या एका शैक्षणिक संकुलाच्या प्रश्नासाठी झाल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अख्तरित असलेल्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे तहयात अध्यक्ष आहेत. तसेच, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा विद्यमान चेअरमन या शिक्षण संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून कारभार पाहत असतो. सध्या या कारखान्याचे चेअरमन अजित दादा असल्यामुळे त्यांनी शिक्षण संस्थेशी संबंधित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करणं आणखी सोप्पं! ‘या’ नव्या प्लॅनविषयी माहितीये?
शिक्षक भरतीसह अनेक बाबींमध्ये अनियमितता
शरद पवार हे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असून गेल्या अनेक वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे, अजितदादा या संस्थेच्या विश्वस्त मंडळावर कार्यरत आहेत. मात्र वार्षिक सर्वसाधारण सभेशिवाय या नेते मंडळींनी कधी शिक्षण संस्थेच्या कामकाजात लक्ष घातलं नाही. अजितदादांनी कारखान्याच्या चेअरमन पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर या संस्थेच्या कारभारात लक्ष घातलं असून शिक्षक भरतीसह अनेक बाबींमध्ये अनियमितता आढळून आल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा: प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या! मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळला अन्... धक्कादायक घटना
कोणत्या कार्यकर्त्याला मिळणार संधी?
दोन दिवसांपूर्वी माळेगाव कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अजितदादांनी याबाबतची खंत व्यक्त केली होती. संस्थेचे अध्यक्ष या नात्याने पवार साहेबांच्या कानावर संस्थेच्या कामकाजाची माहिती घालण्यासाठी, तसेच संस्थेच्या विश्वस्त मंडळावर माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून सहा जणांची निवड करण्यात येणार आहे. याबाबत सहा गटातून कोणत्या कार्यकर्त्याला शिक्षण संस्थेवर विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी द्यायची यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.