'तुमच्या मुलांना आणि शेजाऱ्यांना समजून सांगा की...', CJP आंदोलनाच्या आधी पोलिसांची गल्ली-बोळात जाऊन घोषणा!

मुंबई तक

दिल्लीमध्ये 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या CJP आंदोलनापूर्वी पोलिसांनी जंतर-मंतरवरील प्रदर्शनाला परवानगी नाकारली आहे. याचवेळी दिल्ली पोलीस हे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात जाऊन आंदोलनात कोणीही सहभाग होऊ नये अशी घोषणा करत आहेत.

ADVERTISEMENT

delhi police warns announcement cjp protest jantar mantar security 25000 personnel
दिल्ली पोलीस अलर्टवर
Google CTA

नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि काही विद्यार्थी संघटनांनी 10 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाला परवानगी नाकारली असून, उत्तर-पूर्व दिल्लीतील हर्ष विहारसह अनेक भागांत पोलिसांकडून गस्त घातली जात आहे. लाऊडस्पीकरवरून घोषणा करत नागरिकांनी आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

'मुलांना आणि शेजाऱ्यांनाही समजावून सांगा'; पोलिसांची घोषणा

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून विविध भागांत लाऊडस्पीकरच्या माध्यमातून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. 10 ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरवर होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच, नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कलम 163 लागू असल्याने निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

नागरिकांनी स्वतःसोबत आपल्या मुलांना आणि शेजाऱ्यांनाही या निर्बंधांची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.

आंदोलनाला परवानगी का नाकारली?

दिल्ली पोलिसांनी CJP आणि काही विद्यार्थी संघटनांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनासाठी मागितलेली परवानगी नाकारली आहे. नवी दिल्ली रेंजच्या संयुक्त पोलीस आयुक्त नूपुर प्रसाद यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.