NCP: शरद पवारांच्या भेटीनंतर वळसे-पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, दिवाळीनिमित्त ही त्यांची कौटुंबीक भेट होती. त्यामुळे या अशा भेटीत कोणतीही राजकीय चर्चा होत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT

स्मिता शिंदे, जुन्नर : राज्यातील राजकारण सध्या अनेक मुद्यांनी गाजत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्यावरुन कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आधी शिवसेना (Shivsena) आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party) फूट पडली. एकाच पक्षावर दोन गटाकडून दावा केला जाऊ लागला. त्यामुळे राज्यातील राजकारण आणखी ढवळून निघाले. त्यातच आता एका नव्या मुद्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
अजित पवार यांची पाठराखण
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधी दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांना शरद पवार यांच्या अगदी जवळची व्यक्ती समजली होती. मात्र ज्या वेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत वेगळी चूल मांडली त्यावेळी मात्र दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवारांचा हात सोडून अजित पवारांबरोबर जाणं पसंद केले. त्यामुळे आजही दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांची पाठराखण करत ज्यांच्याबरोबर अजित पवारांनी घरोबा केला आहे. त्यांच्याबरोबर जात योग्य पद्धतीने काम चालले आहे असंही त्यांनी सांगितले आहे.
अजित पवार अमित शहांसोबत
दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना सांगितले की, सध्या युतीतील तिन्हीही पक्ष एकत्र आले आहेत, आणि त्याचबरोबर ते राज्यात एकाच विचाराने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीबद्दलही बोलताना सांगितले की, अजित पवारांनी काल दिल्लीत अमित शहांसोबत जी काही भेट झाली आहे अशी चर्चा आहे. त्याबाबत अजून मलाही काही समजलं नाही. मात्र जे काही चालू आहे. ते व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने चालू असून युतीतले तीनही पक्ष एकत्र विचाराने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कौटुंबिक भेटीत राजकीय चर्चा नाही
अमित शहा यांच्या भेटीबद्दल बोलल्यानंतर त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याही भेटीबद्दल त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांची झालेली भेट ही कौटुंबिक भेट होती आणि कौंटुंबीक पातळीवरचीच चर्चा होती. अशा या कौटुंबिक भेटीत राजकीय चर्चा होत नसल्याचा निर्वाळा देत वळसे-पाटलांनी शरद पवार अजित पवार भेटीवर पडदा टाकण्याचं काम केलं.