शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार? एकनाथ शिंदेंनी अयोध्येत दिलं उत्तर
शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा सातत्याने होत असते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे प्रभू रामाचे दर्शन घेणार असून, राम मंदिराच्या बांधकामाची पाहणीही करणार आहेत. दरम्यान, याच दौऱ्यात ‘आज तक’ला मुख्यमंत्री शिंदे यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का? प्रश्नावर भूमिका मांडली.
शिवसेनेचे दोन्ही गट (ठाकरे आणि शिंदे गट) एकत्र येणार का? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, “दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी नाही. आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत, जो बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता. बाळासाहेब ठाकरेंचा विचार तोंडून जे सरकार बनवलं होतं, ते आता नाही.”
संबंधित बातमी >> पायी रॅली, महंतांचे दर्शन आणि शरयू आरती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असा आहे दौरा
“शिवसेना आणि भाजप नैसर्गिक युती आहे. आमची आणि भाजपची विचारधारा सारखी आहे. आधी लोकांना हिंदू म्हणायलाही भीती वाटत होती. 2014 मध्ये जेव्हा मोदीजींचे सरकार आले, तेव्हापासून हिंदुत्वावाचा मान सन्मान केला जात आहेत. ‘गर्व से कहो हम हिंदू है’, हा नारा देणारे बाळासाहेब ठाकरे होते”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंना शिंदेंचं चॅलेंज, सावरकरांच्या मुद्द्यावर काय म्हणाले?
यावेळी एकनाथ शिंदे यांनी सावरकरांच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना घेरलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “वीर सावरकरांचा अपमान हा संपूर्ण भारताचा अपमान आहे. हिंदुत्वाचा अपमान आहे. त्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांच्या किती यातना सहन केल्या.”