दहशतवादी ते भारतासाठी प्राण देणारा काश्मिरी... तुमच्याही डोळ्यात पाणी येईल अशी आहे नझीर वाणीच्या शेवटच्या ऑपरेशनची कहाणी!
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. पण याच दरम्यान, आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत जी वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
ADVERTISEMENT

जम्मू-काश्मीर: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण काश्मीरमधील वातावरण हे ढवळून निघालं आहे. अनेकजण हे स्थानिक काश्मिरी नागरिकांवर टीकाही करत आहे. अशावेळी या हल्ल्यानंतर अनेक स्थानिक काश्मिरींनी या हल्ल्यातील जखमी पर्यटकांना आणि त्यांच्या बायका-मुलांना मदत केल्याचं समोर आलं होतं. पण काश्मिरी नागरिक हे मदतीपुरताच मर्यादित नाहीत. दहशतवाद काश्मीर खोऱ्यातून कायमचा नष्ट व्हावा यासाठी प्राण देणारे काश्मिरी देखील याच मातीत आपल्याला सापडतात. अशाच एका काश्मिरी नागरिकांच्या सर्वोच्च बलिदानाची कहाणी आम्ही आपल्याला सांगणार आहोत. जी वाचल्यानंतर तुमच्याही डोळ्यात आसवं उभी राहतील.
ही कहाणी आहे नझीर वाणी याची.. जो कधीकाळी दहशतवादी होता. पण त्याने अखेरचा श्वास घेतला तो भारतमातेच्या रक्षणासाठी...
2004 साली नझीर वाणीने आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर लवकरच नझीर भारतीय सैन्यात भरती झाला. एकेकाळी सैन्याविरुद्ध लढणाऱ्या या शूर जवानाने नोव्हेंबर 2018 मध्ये दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी आपले प्राण अर्पण केले. पण त्याच्या शेवटच्या लढाईची कहाणी अक्षरश: अंगावर काटा आणणारी आहे.
लेफ्टनंट जनरल सतीश दुवा (निवृत्त) यांनी 'लल्लनटॉप'च्या मुलाखतीत नझीर वाणीचा दहशतवाद ते लष्कराचा सैनिक या सगळा प्रवास सांगितला. एवढंच नव्हे तर त्याचं शेवटचं ऑपरेशन कसं झालं याची कहाणी देखील सांगितली.
देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या नझीर वाणीची शेवटची लढाई जशीच्या तशी...
दहशतवादी असलेला नझीर वाणी लष्करात आला!
'आम्ही दहशतवाद्यांशी लढण्यासाठी टेरिटोरियल आर्मी बटालियन (Territorial army battalion) तयार केली. जे दहशतवादी लष्कराला शरण आले होते त्यांनाच या बटालियनमध्ये घेण्यात आलं. जे आजपर्यंत जगात कुठेही झालेलं नाही. त्यांना आम्ही लष्करात सामील करून घेतलं. ती माझ्या रेझिमेंटची बटालियन होती.'
'नझीर अहमद वाणी हा त्याच बटालियनमधील होता. नझीर 9 वर्ष इक्वानमध्ये देखील राहिला. त्यानंतर तो आणि त्याच्या इतर साथीदारांनी बटालियनमध्ये प्रवेश केला. या बटालियनमध्ये सगळे शरण आलेले दहशतवादी होते. ही बटालियन उभी राहिली कशी ही एक रंजक कहाणीच आहे.'

'कारण एवढं सोप्पं नव्हतं यांना सैनिक बनवणं. पहिले इक्वान होते तर ते त्यांच्याच घरात राहायचे. किंवा कॅम्पमध्ये जरी राहत असले तरी ते त्यांच्या पद्धतीनेच राहायचे. त्यांना जवानांप्रमाणे परेड करणं वैगरे क्रमप्राप्त नव्हतं.'
हे ही वाचा>> Pahalgam Attack: जखमींना पाठीवर घेऊन धावत सुटला..., प्रचंड चर्चेत असलेला सजाद भट्ट आहे तरी कोण?
'पण बटालियन तयार करताना यांना सैनिक बनवणं कठीण होतं.पण ती सगळी रंजक कहाणी आहे. पण हे खरं आहे की, टेरिटोरियल आर्मीची जी बटालियन उभी राहिली तिने पुढील 15-20 वर्षात खूप चांगलं काम केलं.'
'मी नझीर वाणीच्या जेवढ्या काही साथीदारांशी चर्चा केली किंवा त्यांच्याशी संपर्क आलेल्या लष्करातील अधिकाऱ्यांशी बोललेलो त्या सर्वांचं एकमत होतं की, नझीर वाणी हा धाडसीच नव्हता तर त्याचा संयम, त्याचं वागणं गे देखील खूप उत्तम होतं.'
'जे त्याचे वरिष्ठ अधिकारी होतं. त्यांना असं वाटायचं की, नझीर आमच्यासोबत ऑपरेशन्समध्ये आहे तर आता काळजी करण्याचं कारण नाही.'
जेव्हा आम्ही दहशतवाद्यांविरोधी कारवाई करायचो तेव्हा आधी आम्ही दहशतवाद्यांना घेरायचो. त्यानंतर दुसरी टीम ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाठवली जाते. जेव्हा आम्ही घेरा लावायचो तेव्हा नझीर हा अत्यंत सावधानपणे प्रत्येक सैनिकाजवळ जायचा कारण त्याला अनुभव होता की, कुठून दहशतवादी हे गोळ्या चालवू शकतात. नझीरला प्रचंड अनुभव होता. कारण तो अल्पवयीन असतानाच दहशतवाद्यांसोबत राहू लागला होता. त्यानंतर त्याने तो मार्ग सोडून देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक वर्ष तो जम्मू-काश्मिरमधील सैनिकी कारवायांमध्ये सहभागी होत होता. ज्यामुळे त्याला या सगळ्याचा प्रचंड अनुभव होता.
'मला एका जवानाने सांगितलेलं की, नझीर येऊन सांगायचा की, सिंगल शॉट फायर करा. ऑटोमॅटिक नका फायर करू.. गोळ्या वाचवा.. जेव्हा गोळीबार सुरू असतो तेव्हा फक्त हेच माहीत असतं की, समोरच्याला ठार करायचं आहे. तेव्हा काही सुचत नाही.'
'एके रायफल हे सिंगल शॉटही फायर करतं आणि बर्स्ट फायरही करतं. म्हणजे एकदा ट्रिगर दाबलं आणि ट्रिगरवरून बोट काढलं नाही तर गोळ्या सुटत राहतील. जर आपणं असं केलं तर 2 सेकंदात तुमची पूर्ण मॅग्झीन खाली होईल. जर तुम्ही 20 राऊंड फायर केलं आणि फक्त जंगलात फायर करत राहिला तर तुम्ही तुमचा दारूगोळा असाच संपवून टाकाल.'
'प्रत्येक व्यक्ती मग दहशतवादी असो किंवा जवान तो सीमित दारूगोळाच सोबत घेऊन येतो. तर अनेकदा असं होतं की, तुम्ही जेव्हा घेरा लावलेला असतो तेव्हा शत्रु किंवा दहशतवाद्यांचं डोकं खाली ठेवण्यासाठी सिंगल शॉटचा वापर करायचा असतो. जेणेकरून त्याला पळता येणार नाही. त्यामुळे हळूहळू गोळीबार करावा लागतो.'
'पण जेव्हा समोरासमोरची लढाई होते तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक किंवा बर्स्ट गोळीबार करायचा असतो. कारण तो अटीतटीचा क्षण असतो. हा फरक असतो सिंगल शॉट आणि ऑटोमॅटिक गोळीबाराचा.'
नाझीर वाणी प्रचंड हुशार आणि हजरजबाबी होता..
'एकदा आमची टीम येत होती आणि त्यांना दहशतवाद्यांनी घेरलं. आमच्या टीममध्ये 7-8 लोकंच होती. त्यामुळे ते इतरत्र पसरले आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. रेडिओवरून त्यांनी अतिरिक्त मदत मागवली. पण हळूहळू दहशतवाद्यांचा दबाव वाढू लागला. त्यांचा गोळीबार अधिक वाढू लागला. त्यावेळी रेडिओवर आम्ही जे बोलत होतो ते ऐकू येत होतं. कारण तो संपूर्ण जंगलाचा भाग होता.'
हे ही वाचा>> प्रत्येक भारतीयाला सतावणारा प्रश्न... पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तिथे Army का नव्हती?
'तेव्हा नझीरने प्रचंड हुशारी दाखवली. त्याने त्यावेळी एकदा हुकुमी आवाजात म्हटलं की, चला रिनफोर्समेंट आली आहे. तुम्ही इकडून जा, तुम्ही तिकडून घेरा.. त्या अशा पद्धतीने गोष्टी सुरू केल्या की, जणू काही जवानांची एक मोठी टीम ही तिथे आली आहे.'
'त्याच्या या हुशारीमुळे एक असं चित्र तयार झालं की, लष्कराची मोठी टीम ही आता घेराव घालण्यासाठी आली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांमध्ये भीती निर्माण झाली आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला.'
खरं पाहिलं तर ज्यावेळी दहशतवाद्यांनी तिथून निघून जाण्यास सुरुवात केली तेव्हा तिथे आमची कोणतीही मोठी टीम पोहोचली नव्हती. मदतीसाठी टीम रवाना झाली होती. पण नझीर असं भासवलं की, टीम तिथे आली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना काढता पाय घ्यावा लागला. नझीर वाणीला दहशतवाद्यांची वैचारिक क्षमता माहिती होती. दहशतवादी तोपर्यंतच गोळीबार करतील जोवर मदतीसाठी टीम येणार नाही. हीच गोष्ट हेरून नझीरने अशी बतावणी केली की मदत करणारी मोठी टीम आता पोहचली आहे. याच भीतीमुळे दहशतवादी निघून गेले.
नझीरचं शेवटचं ऑपरेशन.. देशासाठी दिलं सर्वोच्च बलिदान!
'नोव्हेंबर 2018... ते एक मोठं ऑपरेशन होतं. ही लोकं एका शोध मोहिमेवर गेले होते. त्यांना पक्की खबर मिळाली होती की, आज अमूक-अमूक ठिकाणी दहशतवादी येणार आहेत. पण तसं झालं नाही. दहशतवादी तिथे आले नाही. त्यामुळे ते आपल्या तळावर पुन्हा परतले. त्यानंतर त्यांनी जेवणास सुरुवात केली.'
'जेवण सुरू असतानाच काश्मीरमधील पोलिसांची एक टीम तिथे आली. त्यांनी पक्की माहिती दिली की, बाटागुंड नावाचं गाव आहे आणि तिथे एका घराच्या आत दहशतवादी आहेत. ही माहिती घेऊन पोलीस लष्कराच्या टीमला घेण्यासाठी आले होते.'
तेव्हा नझीरने स्वत: देखील पोलिसांनी काश्मिरीमध्ये बातचीत केली होती. त्यानंतर तो अर्ध्या जेवणावरूनच उठला. त्याने त्यावेळी कंपनीचा कॅप्टन कमांडर जो होता महेश.. त्याला सांगितलं की, आज तुम्हाला ते ऑपरेशन मिळेल जे कंपनी कमांडर साहेब सांगून गेले होते. मूळ कंपनी कमांडर हे काही दिवसांच्या सुट्टीवर गेले होते. त्यामुळे कॅप्टन महेश हे त्यांच्या जागी काही दिवसांसाठी कार्यवाहक कंपनी कमांडर म्हणून आले होते. जेव्हा त्या कंपनीचे मूळ कंपनी कमांडर हे सुट्टीवर जात होते तेव्हा त्यांनी नझीरला सांगितलं होतं की, माझ्यामागे कॅप्टन साहेबांना एक चांगलं ऑपरेशन दे..तर नझीरला ते शब्द आठवले आणि त्याने कॅप्टन महेशला सांगितलं की, आज तो दिवस आला आहे. हे ऑपरेशन होईल. असंच त्याने ही गोष्टी सांगितली.
'त्यानंतर ही लोकं निघाली. कोणताही हल्ला करताना सरप्राइज अटॅक हा भाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे नझीरची टीम ही चालत गेली. त्यांनी दुसऱ्या कंपनीला देखील सांगितलं होतं की त्यांनी दुसऱ्या बाजूने यावं. नझीरच्या टीमने अर्ध्या बाजूने घेराव घातला. पण दुसऱ्या बाजूने जी टीम येत होती ती लोकं गाड्या घेऊन आले. त्यामुळे दहशतवादी सावध झाले आणि गोळीबार सुरू झाला. नाहीतर हे ऑपरेशन चांगल्या पद्धतीने संपवता आलं असतं.'
'पण, गोळीबार सुरू झाला.. जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे घेराव घातल्यानंतर नझीर हा प्रत्येक जवानाजवळ जात होता आणि त्यांना उपयुक्त गोष्टी सांगत होता. हे केल्यानंतर त्याने कॅप्टन महेशला रिपोर्ट केलं. कॅप्टन महेश हा तरूण अधिकारी होता. पण तो आश्वस्त होता की, त्याच्यासोबत नझीर आहे.'
'नंतर गोळीबारादरम्यान, एका पाठोपाठ एक दहशतवादी हे मारले गेले. एक वेळ तर अशी आली की, नझीरने स्वत: एका दहशतवाद्यांच्या दिशेने हँडग्रेनेड फेकला. ज्यामुळे एक दहशतवादी ठार झाला. एक वेळ अशी आली की, महेश आण नझीर हे अशा ठिकाणी होते की, दहशतवादी पळत बाहेर आला तर तो त्यांच्याच दिशेने येईल.'
'जेव्हा एका दहशतवाद्याने पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनुभवी जवान नझीरने पोझिशन घेतली निशाणा लावला आणि दहशतवाद्याला जागीच ठार केलं.'
'थोड्या वेळाने एका ग्रेनेडमुळे ज्या घरात दहशतवादी होते त्याला आग लागली. आग लागलेली असताना देखील घराच्या आतून गोळीबार सुरू होता. अशावेळी घराच्या आता किती दहशतवादी आहेत हे समजू शकत नव्हतं. तेव्हा नझीर आणि टीमने त्या घराच्या मालकाला घराच्या आत पाठवलं.'
'साधारणपणे, दहशतवादी हे ज्या घरात लपलेले असतात त्या घरातील व्यक्ती किंवा सामान्य नागरिकांवर गोळीबार करत नाही. ते यासाठी गोळ्या मारत नाही कारण, यामुळे दहशतवादी सहानुभूती गमावून बसतील आणि नंतर त्यांना कोणीही आपल्या घरात स्थान देणार नाही. त्यामुळे ते त्यांना गोळ्या मारत नाही.'
'म्हणूनच नझीरच्या टीमने घरमालकाला घरात पाठवलं होतं. जेव्हा तो घरमालक घराच्या बाहेर आला तेव्हा त्याने त्याचं 1 बोट दाखवून नझीरकडे इशारा केला. याचा अर्थ स्पष्ट होता की, घरामध्ये आणखी एक दहशतवादी आहे.' 'ही गोष्ट समजल्यानंतर नझीर आणि महेश सावध झाले. कारण ते जर थेट घराच्या आत गेले असते तर बरंच नुकसान झालं असतं. आता घरातील दहशतवाद्याचा खात्मा करण्यासाठी महेश आणि नझीर यांनी आत जाण्याचा निर्णय घेतला.'
आमच्याकडे एक बुलेटप्रूफ शिल्ड असते स्वत:च्या समोर पकडण्यासाठी.. महेशने ती शिल्ड पकडली होती. नझीरने देखील ती शिल्ड उचलली होती. पण त्यावेळी त्याला काय वाटलं ते समजलं नाही. त्याने ती शिल्ड बाजूला ठेवून दिली. त्यानंतर तो त्या खोलीत थेट घुसला. जेव्हा नझीरने चार्ज केलं तेव्हा दहशतवादी आणि नझीर हे आमनेसामने आले. त्या खोलीत आग लागलेली होती. त्यामुळे दहशतवाद्याने भिजवलेलं घोंगडं आपल्याभोवती ओढून घेतलं होतं. जेणेकरून त्याचं आगीपासून रक्षण व्हावं. जेव्हा नझीर आत शिरला तेव्हा त्याने घोंगडं फेकून दिलं आणि गोळीबार केला. पण नझीरनेही तितक्याच क्षणात त्याच्या दिशेने गोळीबार केला होता. दुर्दैवाने दहशतवाद्याने जी गोळी झाडली होती ती नझीरच्या चेहऱ्याला लागली. त्यानंतर कॅप्टन महेशने त्या दहशतवाद्याला जागीच ठार केलं.
'मात्र, तिथेच नझीरला वीरगती प्राप्त झाली. खरं पाहायला गेलं तर त्याने स्वत:चा जीव धोक्यात टाकून कॅप्टन महेशचा जीव वाचवला होता.'

'जेव्हा कॅप्टन महेश मला ही सगळी घटना सांगत होता तेव्हा तो मला सांगताना खूप भावुक झाला होता.'
अशी संपूर्ण कहाणी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सतीश दुवा यांनी जाहीर मुलाखतीत सांगितली. त्यावरून नझीर वाणी हा काश्मिरी व्यक्ती म्हणून कसा होता हे आपल्याला दिसून येतं.
दरम्यान, नझीर वाणीच्या याच सर्वोच्च बलिदानाची सरकारने देखील दखल घेतली. त्याला मरणोत्तर अशोक चक्र बहाल करण्यात आलं.