‘महायुतीच्या पंगतीत बसलात तर वाढलेले पदार्थ खावेच लागतील', शिंदेंचे शिलेदार झालेल्या बच्चू कडूंना कोणी सुनावलं?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या आमदार बच्चू कडू यांना भाजप नेत्याने खडे बोल सुनावले आहेत. तसेच महायुतीमध्ये जुळवून घेण्याचा सल्ला देखील दिला आहे.
ADVERTISEMENT

रोहिदास हातागळे, बीड: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले विधानपरिषद आमदार बच्चू कडू आणि महायुतीमधील तणाव आता अधिक वाढताना दिसत आहे. "आम्ही बच्चू कडू यांना आमच्यासोबत मॅच व्हा, असं कधीच निमंत्रण दिलं नाही," अशा कडक शब्दांत भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी कडू यांना सुनावले आहे. महायुतीत राहायचे असेल तर इथले नियम पाळावेच लागतील, असा स्पष्ट संदेशही त्यांनी यावेळी दिला.
भाजप नेत्याने बच्चू कडूंचे टोचले कान
बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या कारभारावर आणि विशेषतः भाजपवर टीका करत आहेत. याला प्रत्युत्तर देताना कुलकर्णी यांनी उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले की, "जर तुम्ही महायुतीच्या पंगतीत बसला असाल, तर तिथे जे पदार्थ खायला मिळतील ते तुम्हाला खावेच लागतील. पंगतीत बसून स्वतःच्या आवडीनिवडी सांगण्याला अर्थ नसतो."
हे ही वाचा>> 'आमची हाय लागल्याशिवाय राहणार नाही...', शिंदे गटात गेलेल्या बच्चू कडूंवर कार्यकर्ता तुफान चिडला.. नको नको ते बोलला!
बच्चू कडू यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कुलकर्णी यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. "भारतीय जनता पक्ष हा कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक विचारावर चालणारा पक्ष नाही. आमचा पक्ष विकास आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन समाजात काम करतो. बच्चू कडू यांनी हे लक्षात घ्यायला हवे," असेही ते म्हणाले. बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिले होते. मात्र, भाजपने आता बचावात्मक पवित्रा न घेता आक्रमक भूमिका घेतल्याचे कुलकर्णी यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. आता राम कुलकर्णी यांच्या या 'पंगत' अस्त्राला बच्चू कडू काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बच्चू कडूंवर त्यांचा कार्यकर्ताही संतापला
दुसरीकडे बच्चू कडू यांचं शिवसेनेत प्रवेश करणं हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांना पटलेलं नाही. त्यापैकी एका कार्यकर्त्याने त्यांच्याविषयी अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे.









