'मुंबई महाराष्ट्राची नाही...', मुंबईत येऊन भाजप नेत्याचं मुंबईकरांना डिवचणारं अत्यंत वादग्रस्त विधान
तमिळनाडू भाजपचे प्रमुख के. अण्णामलाई यांनी "बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे." असं अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यामुळे विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: तमिळनाडू भाजपचे प्रमुख के. अण्णामलाई यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या एका विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण केला आहे. मुंबईतील मालाड येथे भाजप उमेदवार तेजिंदर सिंह तिवाना यांच्या प्रचारसभेत बोलताना अण्णामलाई म्हणाले, "बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे." या विधानाने विरोधी पक्षांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
मुंबईत येऊन नेमकं काय म्हणाले अण्णामलाई
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने देशभरातील नेत्यांना प्रचारासाठी बोलावले आहे. याच अनुषंगाने तमिळनाडूचे भाजप प्रमुख के. अण्णामलाई गुरुवारी (8 जानेवारी) मुंबईत दाखल झाले. मालाडमधील वॉर्ड क्रमांक 47 मधील उमेदवार तेजिंदर सिंह तिवाना यांच्या प्रचारात ते सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना मुंबईच्या विकासावर भाष्य केले.
त्यावेळी अण्णामलाई म्हणाले, "मुंबई ही एकमेव अशी जागा आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे - केंद्रात मोदीजी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि महापालिकेत भाजप महापौर. कारण बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट ७५,००० कोटी रुपये आहे, जो छोटा आकडा नाही. चेन्नईचे बजेट केवळ ८,००० कोटी आणि बंगळुरूचे १९,००० कोटी आहे. विकासासाठी चांगले प्रशासक हवेत."
हे विधान मुंबईला 'बॉम्बे' म्हणून संबोधण्यावरून आणि 'महाराष्ट्राचे शहर नाही' या शब्दांवरून वादग्रस्त ठरले आहे. अण्णामलाईंच्या या वक्तव्याचा संदर्भ मुंबईच्या विकास आणि केंद्र-राज्य-महापालिका यांच्यातील समन्वयावर आहे. ते म्हणतात की मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी मजबूत प्रशासन आणि ट्रिपल इंजिन सरकार आवश्यक आहे. मात्र, विरोधकांनी हे विधान मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करणारे आणि मराठी अस्मितेचा अपमान करणारे म्हणत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.










