Kirit Somaiya: 'अशी अवमानास्पद वागणूक देऊ नका', किरीट सोमय्यांचा लेटरबॉम्ब... भाजपमध्ये मोठी खळबळ
BJP: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या एका पत्राने पक्षामध्ये एकच खळबळ उडाली आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

किरीट सोमय्या यांच्या पत्राने भाजपमध्ये मोठी खळबळ

भाजपने निवडणूक आयोग संपर्क प्रमुखपदी केली होती नियुक्ती

सोमय्या म्हणतात अशी अवमानास्पद वागणूक देऊ नका
Kirit Somaiya BJP: मुंबई: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये बऱ्याच घडामोडी होत असताना दुसरीकडे भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांच्या एका पत्राने पक्षात एकच खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा निवडणुका या आता लवकरच जाहीर होतील त्या दृष्टीने भाजपने विधानसभा निवडणूक 2024 व्यवस्थापन समिती तयार केली आहे. पण याच समितीमुळे किरीट सोमय्या हे प्रचंड खवळले असून त्यांनी निवडणूक समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अत्यंत खरमरीत पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. (kirit somaiya said chandrashekhar bawankule and raosaheb danve dont be treated like this kirit somaiya letterbomb big stir in bjp)
नेमकं प्रकरण काय?
भाजपकडून विधानसभा निवडणूक 2024 व्यवस्थापन समितीची आज (10 ऑगस्ट) घोषणा करण्यात आली. सुरुवातीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, ही यादी प्रसिद्ध होताच किरीट सोमय्या मात्र, चांगलेच संतापले. त्यानंतर त्यांनी एक पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत आपल्यावर पक्षाने अन्याय केल्याची भावना या पत्रातून त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.
किरीट सोमय्या यांनी आपला राग व्यक्त करताना पत्रात म्हटलंय की, त्यांना न विचारता निवडणूक समितीत त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ही पद्धत चुकीची आहे. सोमय्या हे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पत्राच्या शेवटी थेट असंही म्हटलं की, 'आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये.' यामुळे किरीट सोमय्या हे प्रचंड नाराज असल्याचं दिसून येत आहे.