Sharad Pawar: कात्रजचा घाट, तेल लावलेला पैलवान.. ‘पॉवर’फुल पवारांचे प्रचंड इंटरेस्टिंग किस्से!
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रचंड चर्चेत आले आहेत. जाणून घ्या शरद पवार यांच्याबाबतच्या इंटरेस्टिंग गोष्टी.
ADVERTISEMENT
मुंबई: शरद गोविंदराव पवार… (Sharad Pawar) हे नाव राजकारणातून निवृत्त जरी झालं तरी महाराष्ट्रात (Maharashtra) त्या नावाची चर्चा नेहमीच होत राहील. कारण शरद पवार हे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर कायमच देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. शरद पवारांच्या राजकीय आयुष्यातल्या अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे पवारांना नेहमीच गेमचेंजर म्हणून म्हटलं गेलं आहे. तसंच त्यांना महाराष्ट्रात अनेक जण तेल लावलेला पैलवान देखील म्हणतात. शरद पवारांचे राजकीय डावपेच हे भल्याभल्यांना कळत नाही. त्यांच्या याच डावपेच आणि त्यांच्या एकूण राजकारणावर आपण टाकूयात एक नजर. (know the interesting incidents about sharad pawar which showed his political power)
ADVERTISEMENT
2 मे 2023 रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घोषित केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी राडा घातला. घोषणा मागे घेण्याची विनंती केली पण पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ही घोषणा मुळात 1 मे रोजी होणार होती, मात्र महाविकास आघाडीच्या सभेमुळे पवारांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम 2 मे रोजी घेण्यात आला. आता 1 मेचं महत्त्व शरद पवार यांच्या आयुष्यात मोठं आहे, कारण शरद पवार यांनी 1 मे 1960 रोजी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलेलं.
शरद पवार कसे बनले राजकारणातील चाणक्य?
1 मे 1960 रोजी शरद पवार पुणे शहर युवक काँग्रेसचे सदस्य झाले. 1966 मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या, बारामती विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार उभे राहिले आणि वयाच्या 27व्या वर्षी मोठ्या फरकाने पवार आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले.
हे वाचलं का?
याच काळात पवारांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या सचिवपदी निवड झाली. 1972 मध्ये दुसऱ्यांना आमदार म्हणून शरद पवार निवडून आले. त्यावेळी पवारांचा लोकांमधला सहभाग आणि कामाची पद्धत या गोष्टींमुळे वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात सामान्य प्रशासन आणि गृहराज्यमंत्री पदाची त्यांना संधी मिळाली.
हे ही वाचा >> Shalini Patil : “सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा, अजित पवारांना अटक होऊ शकते”
वर्ष होतं 1977 चं… आणीबाणीनंतर कॉंग्रेस फुटली, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. वसंत पाटलांसह शरद पवारही मुख्य काँग्रेसमधून बाहेर पडले. 1978 मध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि वसंत पाटील मुख्यमंत्री झाले. सरकार स्थापन झालं खरं पण याचवेळेस शरद पवार 40 आमदारांना घेऊन सरकारच्या बाहेर पडले आणि हेच होतं शरद पवार यांचं पहिलं बंड.
ADVERTISEMENT
इथून पुढे शरद पवार यांच्यावर ‘पाठीत खंजीर खुपसण्याचे आरोप होऊ लागले. बंडानंतर जुलै 1978 मध्ये ‘पुरोगामी लोकशाही दल’ म्हणजेच ‘पुलोद’चं सरकार स्थापन झालं आणि 38 व्या वर्षी शरद पवारांनी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हे सरकार दीड वर्ष चाललं आणि पडलं. याच काळात पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली आणि पंतप्रधान पदाची जबाबदारी राजीव गांधी यांच्याकडे आली आणि राजीव गांधी यांनाही वाटू लागलं की शरद पवारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं. झालंही तसंच… 1986 साली त्यावेळेच्या औरंगाबादमध्ये पवारांनी घोषणा केली आणि पवार 1988 मध्ये महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
ADVERTISEMENT
आता 1993 च्या वर्षाची सुरुवात होती, बाबरी मशिद पाडल्यामुळे देशात तणावाचं वातावरण होतं, त्याहीपेक्षा वाईट परिस्थिती होती मुंबईची. याच परिस्थिती शरद पवार तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
शरद पवार यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे 1999 साली. राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनिया गांधींची राजकारणात एन्ट्री झाली होती, 1999 साली सोनिया गांधी पंतप्रधान होतील, अशा चर्चांना उधाण आलं, शरद पवारांनी याच मुद्द्याला विरोध केला आणि काँग्रेसमधून बाहेर पडले. परिणामी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
या नंतर शरद पवारांना मैदानात उतरावं लागलं ते थेट 2019 ला… 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करायचं होतं. मुख्यमंत्री पदावरुन भाजप आणि शिवसेनेत वाद सुरु झाले, शिवसेना, राष्ट्रवादीच्या जवळ येऊ लागली आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मदतीने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. एकीकडून भाजपचे आरोप, दुसरीकडून आपल्या आमदारांमधली धुसफूस असा दुहेरी संघर्ष शरद पवार यांना करावा लागत होता. कारण याच काळत उद्धव ठाकरे अंथरुणाला खिळून होते. अशातच शिंदेंनी बंडखोरी करुन महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि ते स्वत:च मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जाऊन विराजमान झाले.
हे ही वाचा >> NCP: शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार, राजीनाम्याच्या निर्णयावर यू-टर्न?
या सगळ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्वस्थता वाढत गेली. त्यातच अजित पवार काही आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडणार अशीही चर्चा रंगली होती. असं असताना 2 मे 2023 चा याच दिवशी शरद पवारांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यामुळे राडा झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल नव्या रस्त्याने चालण्यास सुरुवात झाली.
हे तेच शरद पवार आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत केंद्रात आणि राज्यात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले होते. हे तेच पवार होते, ज्यांनी देशपातळीवर आपल्या नावाचा विचार करायला भाग पाडलं. आपल्या अनेक निर्णयांनी आपल्याच कार्यकर्त्यांना धक्का देणारे हे तेच शरद पवार आहेत, ज्यांनी आपल्याच पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. आता इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल कशी असेल, राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असेल, पवारांनी ज्या ताकदीने राष्ट्रवादीला मजबूत ठेवलं, त्याच राष्ट्रवादीला येणारा अध्यक्ष मजबूत ठेवणार का?, की हा फक्त पवारांनी नेहमीप्रमाणे अजित पवार आणि भाजपला दाखवलेला कात्रजचा घाट आहे हे येत्या काळात कळणारच आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT