Mla Disqualification : शिंदे-ठाकरेंची धडधड वाढली, व्हीपच करणार करेक्ट कार्यक्रम!
Mla disqualification verdict latest updates : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जो निकाल देतील, त्यात व्हीप कसा महत्त्वाचा ठरणार, याबद्दल विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी केलेलं विश्लेषण…
ADVERTISEMENT

Mla Disqualification case Latest news : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ऐतिहासिक निकाल १० जानेवारी रोजी येईल. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत. या निर्णयाआधी वेगवेगळे मुद्दे चर्चेत आले आहे. या निकालात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असणार, याबद्दलही बोललं जात आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकरणात व्हीप निर्णायक आहे. त्याचा अर्थ राहुल नार्वेकर कसा लावतात आणि ती व्हीप देण्याची प्रक्रिया या बाबी महत्त्वाच्या असतील, असे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांनी केलेल्या विश्लेषणावरून ठाकरे गट असो वा शिंदे गट या दोन्हींपैकी एका गटाला व्हीपमुळे धक्का बसेल, असे मत त्यांनी मांडले आहे. ते नेमके काय म्हणालेत, ते जाणून घ्या.
मुक्त पत्रकार प्रशांत कदम यांना अनंत कळसे यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल त्यांचं मत मांडलं.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात कोणती गोष्ट निर्णायक ठरेल?
या प्रश्नाला उत्तर देताना विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे म्हणाले, “आतापर्यंतच्या विधिमंडळाच्या इतिहासात हा निकाल ऐतिहासिक असेल. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात हा निर्णय गणला जाईल. जसे केशवानंद भारती खटला हा संविधानाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलं. इथे दहाव्या अनुसूचीचा अर्थ हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दोनच बाबी आहेत, यात एक पक्ष कुठला आणि व्हीपचं उल्लंघन करणं. या दोन सिद्ध झाल्या तर त्या सदस्याचं सदस्यत्व जाऊ शकतं. यात तिसरी बाब आहे ती म्हणजे सदस्यत्व राहायचं असेल, तर दोन तृतीयांश सदस्य विधिमंडळ पक्षातून बाहेर पडले आणि इतर कुठल्या पक्षात विलीन झाले तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं. ती महत्त्वाचे मुद्दे यात आहेत.”
हेही वाचा >> ‘नार्वेकर वर्षा बंगल्यावर सेटलमेंट…’, आदित्य ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरच उपस्थित केली शंका
याच मुद्द्यावर कळसे पुढे म्हणाले की “एकनाथ शिंदेंनी स्वेच्छेने पक्ष सोडलाय का? त्यांनी व्हीपचे उल्लंघन केले आहे का? किंवा त्या गटाने दुसरा पक्ष काढला असेल आणि ते दुसऱ्या पक्षात विलीन झाले का?या तीन मुद्द्यांवर विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावा लागेल. पहिला मुद्दा जो आहे, तो म्हणजे त्यांनी स्वेच्छेने पक्ष सोडलाय का? तर यामध्ये महत्त्वाचं आहे की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या १२ मे रोजीच्या निकालात म्हटलं आहे की, सुनील प्रभू हेच त्यावेळच्या पक्षाचे व्हीप आहेत. यात प्रश्न असा निर्माण होतोय की हा व्हीप त्यांना कायदेशीरदृष्ट्या लागू होईल, असं मला वाटतं. पण, तो दिला गेलाय का? त्यांनी तो स्वीकारलाय का? हा एक महत्त्वाचा मुद्दा अध्यक्षांना निश्चित करावा लागेल. दुसरं म्हणजे व्हीपचं उल्लंघन केलंय का?”