'सभागृहात रमी खेळणं हे काही...', CM फडणवीसांचं 'हे' विधान माणिकराव कोकाटेंसाठी धोक्याचा इशारा?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळ सभागृहात रमी सर्कल खेळताना आढळून आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ज्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT

पुणे: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळाच्या सभागृहात मोबाइलवर 'रमी सर्कल' खेळत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे विरोधकांनी कृषीमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाचे आमदाीका केली र रोहित पवार यांनी शेअर केला असून, त्यांनी यावरून सरकारवर तिखट टआहे. या प्रकरणाने सत्तारूढ महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधी पक्षांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे लावून धरली आहे. याच प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'रमी खेळतानाचा Video हा काही निश्चितच योग्य नाही. जे काही घडलंय ते काही भूषणावह नाही.' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्र्यांचे कान टोचले आहेत.
हे ही वाचा>> कर्माचं फळ! भाजप नेते प्रफुल्ल लोढांना हनी ट्रॅप प्रकरणात अटक, तरुणींचे अश्लील फोटो बनवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (21 जुलै 2025) रात्री प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'मला असं वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारे विधानभवनात ज्या वेळी चर्चा सुरू असते त्यावेळी आपलं कामकाज नसलं तरीही त्या ठिकाणी सीरियसली बसणं गरजेचं आहे. साधारणपणे.. एखाद्या वेळेस असं होतं की, तुम्ही कागदपत्रं वाचता, बाकी गोष्टी वाचता.. पण रमी खेळतानाचा Video हा काही निश्चितच योग्य नाही. अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील केलेला आहे की, मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ते पॉप झालं. पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरीही एकूण जे काही घडलंय ते काही भूषणावह नाही.'
घटनेचा तपशील
व्हिडिओमध्ये कोकाटे हे विधानमंडळाच्या सभागृहात बसले असताना त्यांच्या मोबाइलवर रमी सर्कल हा ऑनलाइन गेम खेळताना ते दिसत आहेत. ही घटना नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान घडली असल्याचे सांगितले जात आहे. रोहित पवार यांनी या व्हिडिओसह ट्विट करत म्हटले आहे की, "राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना आणि शेतीशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित असताना कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त आहेत. ही सरकारची असंवेदनशीलता आहे." त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, "कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ऑनलाइन गेमिंगवर बंदीची मागणी करणारी सरकार आता स्वतःच्या मंत्र्यांमुळे अडचणीत सापडली आहे का?"
हे ही वाचा>> 'हे सगळे आमदार माजले.. असं लोकं बोलतायेत', CM फडणवीस विधानसभेत एवढे का संतापले?
माणिकराव कोकाटे यांचे स्पष्टीकरण
या वादावर प्रतिक्रिया देताना माणिकराव कोकाटे यांनी स्वतःचा बचाव केला आहे. त्यांनी सांगितले की, "मी रमी खेळत नव्हतो. माझ्या मोबाइलवर युट्यूब चालू होते आणि त्यावर रमी सर्कलची जाहिरात आली होती. जाहीरात बंद करताना रमी सर्कल खेळ आपोआप पॉप अप झाला. तुम्हाला जो व्हिडिओ दिसतोय तो संपूर्ण नाही, त्यातून मला बदनाम करण्याचा डाव आहे."
दरम्यान, विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांचं स्पष्ट खोटं असल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओतील दृश्य काय आहेत ते स्पष्ट दिसत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
विरोधकांचा रोष
विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चालवला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, "शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे मंत्री सभागृहात गेम खेळतात, हे सरकारच्या गांभीर्याचं द्योतक आहे." दुसरीकडे, काही ठिकाणी शेतकरी संघटनांनीही या प्रकरणावर निषेध नोंदवला असून, लातूर आणि वाशिममध्ये आंदोलने झाली आहेत.
राजकीय भूकंप
या प्रकरणाने महायुती सरकारच्या अंतर्गत समन्वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोकाटे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते असून, त्यांच्या या कृत्याने पवार यांच्यावरही दबाव वाढला आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेनेचे नेते या प्रकरणातून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. राजकीय निरीक्षकांचे मत आहे की, हे प्रकरण पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होऊ शकते आणि सरकारला त्यावर ठोस भूमिका घ्यावी लागेल.
दरम्यान, या प्रकरणी कोकाटे यांच्यावर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण अनेक शेतकरी संघटनांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून लवकरात लवकर निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.