Sanjay Raut : “मोदी बैठकीत म्हणाले, आता माझ्या नावावर मते मागू नका”

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

maharashtra politics : Sanjay Raut slams narendra modi.
maharashtra politics : Sanjay Raut slams narendra modi.
social share
google news

Sanjay Raut vs Narendra Modi : भाजपने लोकसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केलंय. एनडीएतील मित्रपक्षांना जोडलं जात आहे. बैठकांवर बैठक सुरू आहे. पंतप्रधान मोदीही बैठका घेत असून, एका बैठकीबद्दल शिवसेनेना (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय.

संजय राऊतांनी रोखठोकमधून काही मुद्द्यावर भाष्य केलं आहे. ‘नेहरू वंशाचा ‘गांधी’ , 2024 च्या विजयाचे रणशिंग’, या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात राऊत म्हणतात, “राहुल गांधी पुन्हा संसदेत पोहोचले व अविश्वास ठरावाच्या चर्चेत त्यांनी जोरदार हल्ले केले. 9 ऑगस्टच्या क्रांतिदिनी नेहरू वंशातील एक ‘गांधी’ मोदी-शाहांच्या मनमानी सत्तालोलुपतेविरोधात उभा राहिलेला देशाने पाहिला. मोदी यांना 2024 ची निवडणूक सोपी राहिलेली नाही.”

“पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या मुठीतून सत्तेची वाळू सटकत आहे. 2024 पर्यंत त्यांची मूठ रिकामी झालेली असेल हे आता स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षाने संसदेतून काढले. त्यासाठी गुजरातच्या भूमीवरील न्याय यंत्रणा व कायद्याचा गैरवापर केला. तेच राहुल गांधी सरकारवरील अविश्वास ठरावाच्या वेळी संसदेत पोहोचले. अविश्वास ठरावावर ते खणखणीत बोलले. तेव्हा भाजप सदस्यांनी फक्त गोंधळ घालण्याचेच काम केले. राहुल गांधी हे आदल्या दिवशी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पोहोचले. सोबत सोनिया गांधी होत्या. मध्यवर्ती सभागृहात बसलेले भाजपचे सदस्य तेव्हा पळून गेले. राहुल गांधी जवळ आले व त्यांनी हस्तांदोलन केले तर ‘वर’पर्यंत वृत्त जाईल व नोकरी गमवावी लागेल हे भय आज दिल्लीत सर्वत्र आहे”, असं राऊतांनी म्हटलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्मृती इराणींवर टीकास्त्र

“राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी तावातावाने स्मृती इराणी उभ्या राहिल्या; पण त्यांच्याकडे एक मिश्किल कटाक्ष टाकत राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले. राहुल गांधींचा पराभव करून 2019 साली स्मृती इराणी निवडून आल्या, पण 2024 साली अमेठीची जनता चूक सुधारेल. प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवावी असे अनेकांचे आज मत आहे. प्रियंका गांधी यांच्याशी मोदी यांना मुकाबला करावा लागेल व निकाल काय लागेल ते कोणीच सांगू शकणार नाही. मोदी हे गुजरात व वाराणसी अशा दोन मतदारसंघांतून निवडणुका लढवतील, पण वाराणसी त्यांच्यासाठी सोपे राहणार नाही. देशाचे वातावरण आणि वारे पूर्ण बदलत आहेत”, असं भाष्य संजय राऊतांनी केलं आहे.

वाचा >> शरद पवार अजित पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक, भेटीमागचं कारण काय?

“पंतप्रधान मोदी हे सध्या दिल्लीत राज्याराज्यांतील ‘एनडीए’ खासदारांच्या बैठका घेत आहेत. एका बैठकीत ते म्हणाले, ‘आता फक्त माझ्या नावावर मते मागू नका. तुमच्या कामावर मते मिळवा.’ याचा अर्थ असा की, फक्त मोदी नावावर मते मिळणार नाहीत हे त्यांनी स्वीकारले आहे.”

“महाराष्ट्र सदनात त्यांनी महाराष्ट्रातील ‘एनडीए’ खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे फोडलेले खासदार उपस्थित होते. त्यांच्यासमोर मोदी म्हणाले, ‘शिवसेनेशी युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली.’ ‘सामना’ माझ्यावर टीका करतो, असे दु:ख त्यांनी व्यक्त केले. मोदी यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर हे विधान केले. शिवसेना-भाजप युतीचा ‘मित्रकाळ’ 25 वर्षांचा होता व त्या मित्रकाळात मोदी-शाह कोठेच नव्हते”, असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी नरेंद्र मोदींनी युतीबद्दल केलेल्या विधानावर दिलं.

ADVERTISEMENT

वाचा >> Sedition law : देशद्रोहाचा कायदा संपणार का? मोदी सरकारच्या नव्या कायद्यात काय?

“2014 सालात गुजरातची ही जोडी दिल्लीच्या राजकारणात अवतरली व त्यांनी ‘मित्रकाळ’ युती तोडली. मोदी 2019 चा दाखला देतात, पण मुळात ‘युती’ 2014 सालात भाजपने तोडली. विधानसभेच्या एका जागेवरून भाजपने युती तोडली. एकनाथ खडसे तेव्हा भाजपात होते व युती तोडत आहोत, असे उद्धव ठाकरे यांना अधिकृतपणे सांगण्याची जबाबदारी पक्षाने खडसेंवर सोपवली. खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘युती तोडत आहोत’ असे सांगितले. मोदी यांना हे माहीत नसावे? ते कोणाला चुकीची माहिती देत आहेत? 2019 साली दिलेला शब्द पाळला नाही म्हणून दुसऱ्यांदा युती तुटली. एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्यास तेव्हा भाजपने नकार दिला म्हणून युती तुटली. आता त्याच शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री केले. मोदी यांनी या घडामोडींवर भाष्य केले पाहिजे व खरे बोलायला हवे”, असं राऊतांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

दुसरी भारत जोडो यात्रा

“राहुल गांधी आता दुसऱ्या ‘भारत जोडो’ यात्रेला निघाले आहेत. गुजरातच्या गांधीभूमीवरून ती सुरू होईल व ईशान्येकडे निघेल. त्यात मणिपूर आहेच. त्यानंतर मोदी-शहांनी घेतल्याच तर सार्वत्रिक निवडणुका होतील. देश त्याचीच वाट पाहत आहे. मोदींना इतिहास घडवण्याची संधी नियतीने दिली. मोदींनी काहीच घडवले नाही. एक नवे संसद भवन उभारले, ते सुरू होण्याआधीच पावसात गळू लागले. ‘भारत छोडो’ आंदोलनातून निर्माण झालेल्या स्वातंत्र्याची पहाट संसद भवनात उगवली ते संसद भवन मोदींना नकोसे झाले. तरीही ते ‘भारत छोडो’चे नारे आपल्या विरोधकांविरुद्ध देताना त्याच ऐतिहासिक संसदेने पाहिले. देश परिवर्तनाच्या दिशेने वेगात निघाला आहे! 2024 च्या विजयी लढाईचे रणशिंग फुंकण्यात आले आहे”, असं भाकित राऊतांनी केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT