‘त्यांनी घडवले ते प्रदीप कुरुलकर’, राऊतांनी RSS, फडणवीसांना काय सुनावलं?
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर संजय राऊत यांनी तिखट शब्दात भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT

Sanjay Raut : “सांगलीचे मनोहर भिडे हे आपले गुरुजी आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यांच्या गुरुजींनी गांधींपासून नेहरूंपर्यंत, साईबाबांपासून महात्मा फुलेंपर्यंत सगळ्यांची निंदा सुरू केली आहे. तणाव निर्माण करून दंगली भडकवण्याची ही ‘सुपारी’ आहे”, असा थेट आरोप खासदार संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून केला आहे. (Sanjay Raut slams Devendra Fadnavis over the support to Sambhaji Bhide)
संजय राऊत पुढे म्हणतात, “एखाद्या व्यक्तीचा खून करण्याने विचार मरत नाहीत, कागद अगर पुस्तक जाळल्यानेही विचार नाहीसा होत नाही याची प्रचीती ‘गांधी-चरित्रा’ने येते. देशात मोदींचे सरकार आल्यापासून गांधींचा खून रोज होत आहे, पण तरीही मोदी परदेशात जातात तेव्हा त्यांना कुठे ना कुठे तरी गांधी पुतळ्याचे उद्घाटन करावे लागते. गांधी विचाराने जग प्रभावित आहे.”
“गांधींच्या गुजरातमध्ये मोदी सरकारने सरदार पटेल यांचा अतिउंच पुतळा उभा करून गांधी विचार कमी लेखण्याचा प्रयत्न केला, पण लोक गांधींना विसरायला तयार नाहीत. गांधींना मारणाऱ्या गोडसेची जयंती काही लोक हिंदू म्हणून साजरी करतात. ही विकृती आहे. गांधींच्या पुतळ्यांवर, फोटोंवर गोळ्या मारून गोडसेला श्रद्धांजली वाहिली जाते. तरीही गांधी मरत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात ‘मनोहर भिडे’ नामक व्यक्तीने गांधींवर गलिच्छ शब्दांत चिखलफेक केली त्याची चिंता का करावी?”, असा हल्ला संजय राऊत यांनी संभाजी भिडेंवर चढवला आहे.
संभाजी भिडेंवरून राऊतांनी फडणवीसांना काय सुनावलं?
“मनोहर भिडे यांनी गांधींचा बाप मुसलमान होता असे जाहीर केले. हे विकृतीचे टोक आहे. भिडे हे गुरुजी म्हणून त्यांच्या समर्थकांत ओळखले जातात. देश किंवा समाज घडविण्यात कोणतेही योगदान नसलेली ही माणसे. त्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष केलेले बरे. गांधीजींनी जेथे त्यांच्या खुन्यालाच माफ केले तेथे भिडे यांच्यासारख्यांची काय पत्रास! ‘मनोहर भिडे हे आमचे गुरुजी आहेत,’ असे देवेंद्र फडणवीस अभिमानाने सांगतात, पण या गुरुजींनी फक्त गांधीच नाही, तर असंख्य लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीचे साईबाबा व थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुलेंचादेखील गलिच्छ शब्दांत अपमान केला. त्यामुळे हे असले ‘गुरू’ त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरोत”, अशा शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना खडेबोल सुनावलेत.
संजय राऊतांनी सांगितला इतिहास
1) “महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळाले ही गोष्ट गांधी-निंदा चालविणाऱ्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना सहन होत नाही. हे सर्व लोक गांधींचा मत्सर करतात. गंमत अशी की, यापैकी बहुतेकांना अखंड हिंदू राष्ट्र हवे होते व पाकिस्तानची निर्मिती किंवा फाळणी गांधींमुळे झाली असा त्यांचा दावा आहे; पण या प्रखर विचारांचे हे लोक त्यांच्या क्रांतीचा झेंडा घेऊन स्वातंत्र्य लढ्याच्या रणात कोठेच दिसत नव्हते.”