Mamata Banerjee: ‘मी इंडिया आघाडीचाच भाग, पण…’
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीविषयी आता टोकाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधीच आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (All India Trinamool Congress) अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी आज काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आम्ही एकट्याने निवडणूक लढवू असाच थेट इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच ममता यांनी ही घोषणा केल्याने काँग्रेससाठी (Congress) हा मोठा धक्का ठरू शकणार आहे. कारण राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उद्या बंगालमध्ये दाखल होणार आहे, त्याआधीच ममता बॅनर्जींनी ही घोषणा केल्याने काँग्रेससाठी ही गंभीर बाब असल्याचंही बोललं जात आहे.
गणित फायद्या तोट्याचं
राहुल गांधी यांच्या कालच्या झालेल्या एका सभेत त्यांनी म्हटले होते की, माझे आणि ममता बॅनर्जी यांचे संबंध चांगले आहेत, तर आज मात्र ममता यांनी विश्वासघात केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयाचा नेमका अर्थ काय, आणि त्याचा फायदा कोणाला होणार आणि त्याचा तोटा काय तेच आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काँग्रेसचा हस्तक्षेप का?
ममता बॅनर्जी यांनी याआधीच बोलताना सांगितले होते की, जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांना त्यांच्या त्यांच्या भागात भाजपबरोबर लढू द्या तर दुसरीकडे काँग्रेसला मात्र 300 जागांवर भाजपबरोबर लढू देण्याचा सल्ला दिला होता. मात्र काँग्रेसने जर आमच्यामध्ये हस्तक्षेप केला तर मात्र आम्हाला दुसरा विचार करावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केले होते.
काँग्रेसचा शिष्टाचार
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी सांगितले की, मी काँग्रेसला जे काही प्रस्ताव दिले होते, ते सर्व प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावले, त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकला चलो रेचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, आजपर्यंत मला बंगालमध्ये यात्रा काढणार असल्याची माहिती कोणीही दिली नव्हती. हा काँग्रेस पक्षाचा शिष्टाचार आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित करून इंडिया आघाडीचाच तो एक भाग होता असंही त्यांनी यावेळी खोचकपणे सांगितले.