Devendra Fadnavis: ‘सत्ता येते आणि जाते, पण…’, फडणवीसांचं अजितदादांना खुलं पत्र, महाराष्ट्रात मोठी खळबळ!
Devendra Fadnavis Letter: नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास आमचा स्पष्ट विरोध आहे. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक खुलं पत्रच लिहलं.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis Letter on Nawab Malik: नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे आज (7 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात दाखल झाले. विधानसभेचं आजच्या दिवसाचं सत्र सुरू होताच नवाब मलिक हे थेट सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यानंतर विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपला टार्गेट करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बॅकफूटवर गेले होते. मात्र, आता याच विषयी फडणवीसांनी एक खुलं पत्र (Open Letter) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहलं असून यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. (We have clear opposition to nawab malik being included in mahayuti devendra fadnavis write a open letter to dcm ajit pawar created a stir among maharashtra politicians)
ADVERTISEMENT
महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिक हे मंत्री असतानाच त्यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली होती. यावेळी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे काही महिन्यांपूर्वीच नवाब मलिक हे जामिनीवर सुटले. त्या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट हा सत्तेत स्थापन झाला होता. अशावेळी नवाब मलिक कोणत्या गटात जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं होतं. अखेर आज नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत गेले. यावेळी ते थेट विधानसभेत सत्ताधारी बाकावर जाऊन बसले.
यानंतर विरोधक आणि विशेषत: शिवसेना (UBT) चे आमदार आणि नेते हे अत्यंत आक्रमक झाले. त्यांनी याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. दरम्यान, हा मुद्दा आपल्याला अधिक अडचणीचा ठरू शकतो. हे लक्षात येताच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका असं स्पष्टपणे सांगितलं. पण फडणवीस हे एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी हे पत्र थेट सोशल मीडियावर देखील शेअर केलं. ज्यामुळे महायुतीत या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाहा देवेंद्र फडणवीसांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय.
हे वाचलं का?
देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांबाबत अजित पवारांना लिहलेलं ते पत्र जसंच्या तसं…
श्री. अजितदादा पवार,
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसस्नेह नमस्कार,
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.
परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे.
सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.
त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.
आपला
(देवेंद्र फडणवीस)
सत्ता येते आणि जाते.
पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… pic.twitter.com/WDzm3Pjo3f— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023
हे ही वाचा>> Nawab Malik : अजित पवारांचा कॉल, शरद पवारांना धक्का; मलिक महायुती बरोबर?
असं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी लिहलं आहे. एवढंच नव्हे तर हे पत्र ट्विटरवर शेअर केलं. यावेळी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असं कॅप्शन दिलं की, ‘सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…’ आता फडणवीसांच्या या पत्रामुळे आता महायुतीत मात्र नवा वादंग पेटण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT