अदाणी, सावरकर, मोदींची डिग्री; शरद पवारांच्या गुगलीने विरोधकांचाच बिघडला खेळ!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

sharad pawar different stand raises opposition parties problems
sharad pawar different stand raises opposition parties problems
social share
google news

लोकसभा निवडणूक 2024 ला अजून काही महिन्यांचा अवकाश आहे. असं असलं तरी काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे आणि इतर पक्ष मोदी सरकार आणि भाजपला घेरण्यासाठी व्यूहरचना करताना दिसत आहे. तर दुसरीकडे विरोधकांची एकी महत्त्वाची आहे, असं म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधकांनाच अडचणीत आणताना दिसत आहे. ज्या मुद्द्यांवरून विरोधकांनी भाजपला खिंडीत गाठलं आहे, त्याच मुद्द्यांवर शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेनं भाजपला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे विरोधकांनी ज्या मुद्द्यांमुळे वातावरण तापवलं, त्यावरच पवारांनी घेतलेल्या भूमिकेनं विरोधकांचा खेळ बिघडला आहे.

संसदेच हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासूनच अदाणी समूहाचा मुद्दा चर्चेत होता. राहुल गांधींनी लोकसभेत तो मांडत नरेंद्र मोदींना सवाल केले. त्याचबरोबर दुसरा मुद्दा पुढे आणला तो आम आदमी पार्टीने, तो होता नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा. तिसरा वादाचा मुद्दा ठरला सावरकर…

हेही वाचा >> सावरकरांच्या त्यागाकडे दुर्लक्ष करू शकत नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

काँग्रेसचे नेते राहुल गांधी अधूनमधून सावरकरांचा उल्लेख करून भाजपवर टीका करतात. सूरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात पुन्हा सावरकरांना लक्ष्य केलं. लोक म्हणतात की, राहुल गांधींनी माफी मागितली असती, तर…, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आणि राहुल गांधी म्हणाले, ‘माझं नाव सावरकर नाही. माझं नाव गांधी आहे आणि गांधी कुणाची माफी मागत नाही.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राहुल गांधींच्या या विधानाचे सर्वात जास्त राजकीय पडसाद उमटले ते महाराष्ट्रात. भाजप-शिवसेनेने उद्धव ठाकरेंना कात्रीत पकडलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही मालेगावच्या सभेत सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, म्हणत सुनावलं. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात दरी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यात शरद पवारांनी मध्यस्थी केली आणि अशा पद्धतीची विधान करायला नको असा सल्ला राहुल गांधी आणि सोनिया गांधींना दिला.

शरद पवारांकडून सावरकरांच्या कार्याचं कौतुक

त्यानंतर शरद पवारांनी नागपूरमध्ये सावरकरांच्या कार्याचं कौतुक केलं. पण, सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही म्हणत काँग्रेसला अप्रत्यक्षपणे संदेश दिला. त्याचबरोबर पवार असंही म्हणाले की, “आज सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही. हा जुना मुद्दा झाला आहे. सावरकरांविरोधात आम्ही लोकांनी काही बोललो होतो, ते व्यक्तिगत नव्हते, तर हिंदू महासभेच्या विरोधात होते. मात्र, दुसरी एक बाजू आहे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो त्याग सावरकरांनी केला, त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. दुसरी गोष्ट जी मी संसदेत 32 वर्षापूवी म्हणालो होतो. ते पुन्हा सांगू इच्छितो, सावरकरांची एक गोष्ट आम्हाला खूप आवडते ती म्हणजे त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोण. सावरकरांनी सार्वजनिक जीवनात काही गोष्टी अशा सांगितल्या आणि केल्या होत्या. ज्यात सामाजिक आणि वैज्ञानिक अंग होते.”

ADVERTISEMENT

काँग्रेसच्या मोदी-अदाणीच्या मुद्द्यातील काढली हवा

काँग्रेसने ज्या मुद्द्यावरून थेट पंतप्रधान मोदी आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला, तो होता अदाणी समूहाबद्दलचा. हिंडेनबर्ग रिपोर्टने काँग्रेसला आणखी बळ मिळाल्याचं दिसलं. पण, एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी वेगळीच भूमिका मांडली.

ADVERTISEMENT

हिंडेनबर्ग रिपोर्टचा उल्लेख करत पवार म्हणाले की, “या व्यक्तीने याआधीही अशी विधान केली आहेत आणि तेव्हाही संसदेमध्ये गोंधळ झाला होता. पण, यावेळी गरजेपेक्षा जास्त महत्त्व या मुद्द्याला दिलं गेलं. आणि जो रिपोर्ट आला आहे, त्यात केलेली विधानं कुणी केलीये, त्याची पार्श्वभूमी काय आहे. जेव्हा ते लोक असे मुद्दे उपस्थित करतात ज्यामुळे देशात वाद होतो. त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरच पडतो. असं वाटतंय की हे सगळं कुणाला लक्ष्य करण्यासाठी केलं गेलं आहे.”

अशी भूमिका मांडतानाच शरद पवारांनी विरोधकांकडून केल्या जात असलेल्या जेपीसी चौकशीची मागणीही झटकली. या समितीवर 21 पैकी 15 सदस्य हे सत्ताधारी पक्षातील असतील, असं कारणही त्याला पवार यांनी दिलं. पण, यामुळे काँग्रेस आणि जेपीसीची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाची कोंडी झाली. जेपीसी चौकशी टाळण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर अनेकांनी भुवया उंचावल्या.

नरेंद्र मोदीची पदवी, पवारांचा ‘आप’वर निशाणा

दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पदवीवरून घेरलं. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल सातत्याने हा मुद्दा उचलून धरत आहेत. आपने पदवी दाखवा अशी प्रचार मोहीमच सुरू केली.

पण आपच्या या मुद्द्यावर शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेची जास्त चर्चा होतेय. शरद पवार म्हणाले, “आज देशासमोर पदवीबद्दल प्रश्न आहे का? तुमची पदवी काय आहे, माझी पदवी काय आहे? हा राजकीय मुद्दा आहे का? बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था, महागाई असे अनेक प्रश्न आहेत आणि या मुद्द्यांवरून केंद्र सरकारविरोधात हल्लाबोल करायला हवा. आज धर्म जातीच्या नावावर लोकांमध्ये दुरावा निर्माण केला जात आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे, त्यावर चर्चा करायला हवी,” अशी भूमिका पवारांनी मांडली. पण, पवारांनी आपकडून मांडला जात असलेला मुद्दा निरर्थक असल्याची भूमिका अप्रत्यक्षपणे मांडली.

भाजपकडून पवारांचा बचाव

अदाणींबद्दलच्या मुद्द्यावर शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटलेला दिसला. काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी ट्विट करत टीका केली. त्यांनी पवारांचा उल्लेख केला नाही, पण घाबरट वगैरे म्हणत निशाणा साधला. या ट्विटनंतर भाजपकडून काँग्रेसला लक्ष्य केलं गेलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत काँग्रेससोबत राहिलेले आणि महाराष्ट्रातील मोठे नेते शरद पवार यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही, अशा आशयाचं ट्विट केलं आणि काँग्रेसला सुनावलं. त्याचबरोबर भाजपच्या इतरही नेत्यांनी अलका लांबा यांना प्रत्युत्तर दिलं. पवारांसाठी भाजप नेते सरसावल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT