Uddhav-Raj Thackeray: 'तू परत ये.. मला भेटायला!', उद्धव ठाकरेंना 'शिवतीर्था'वर पुन्हा कोणी आणि का बोलावलेलं? अखेर आलं समोर!
Uddhav Thackeray and Raj Thackeray Meet: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी अचानक का गेले होते याचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (10 सप्टेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट दिली. ही भेट राजकीय चर्चेचा विषय ठरली असली, तरी यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ही भेट पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाची होती आणि ती राज ठाकरे यांच्या आई कुंदा ठाकरे यांच्या इच्छेनुसार घडली. अशी माहिती राऊतांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी या भेटीबाबत माहिती देताना सांगितले की, 'राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. काहीही राजकारण नव्हतं. सत्य असं आहे की, गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राज साहेबांच्या घरी गेले तेव्हा राज साहेबांच्या आई.. म्हणजे उद्धवजींच्या मावशी, काकी यांनी निघताना उद्धवजींना सांगितलं की, गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही. तेव्हा तू परत ये.. मला भेटायला! त्यानुसार, मावशींना भेटायला, कुंदा मावशींना भेटायला.. राज साहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राज साहेबांच्या घरी गेले. ते आज का भेटले हे मी तुम्हाला सत्य सांगितलं.. तुम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण मी सत्य सांगतोय.'
संजय राऊत यांनी पुढे स्पष्ट केले की, "या भेटीत कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. राजकारणाचा याच्याशी काहीही संबंध नाही. ही पूर्णपणे कौटुंबिक भेट होती."
भेटीमागील राजकीय चर्चांना पूर्णविराम
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. विशेषतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय अंगाने पाहिले जात आहे. मात्र, संजय राऊत यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देताना ही भेट केवळ कौटुंबिक असल्याचे सांगितले. "लोकांनी यावरून राजकीय तर्क लढवू नयेत. ही भेट मावशी आणि भाच्यामधील नात्याचा भाग होती," असे राऊत यांनी नमूद केले.

हे ही वाचा>> Thackeray Brother: उद्धव ठाकरे 'या' नेत्याला सोबत घेऊन अचानक का गेले राज ठाकरेंच्या घरी?, 'शिवतीर्थ'वर बंद दाराआड कोणत्या चर्चा?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील कौटुंबिक नाते महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांच्या वेगळ्या राजकीय विचारसरणी असल्या, तरी कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांच्यातील बंध दृढ आहे. आजच्या भेटीने या नात्याची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली.










