Thackeray Brother: उद्धव ठाकरे 'या' नेत्याला सोबत घेऊन अचानक का गेले राज ठाकरेंच्या घरी?, 'शिवतीर्थ'वर बंद दाराआड कोणत्या चर्चा?
Shiv Sena UBT and MNS: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (10 सप्टेंबर) अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. ठाकरे बंधूंची ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकते.
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (10 सप्टेंबर) अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवेळी उद्धव ठाकरेंसोबत पक्षाचे नेते संजय राऊत हे देखील उपस्थित होते. ही भेट पूर्वनियोजित असल्याचे सांगितले जात असले तरी, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ही भेट गुपित राहिल्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे बंधूंच्या या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून, आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चांना वेग आला आहे. सध्या दोन्ही भावांमध्ये मागील अर्धा तासापासून चर्चा सुरू आहे.
महापालिका निवडणूक, दसरा मेळावा आणि ठाकरे बंधूंची भेट
उद्धव ठाकरे आज सकाळी राज ठाकरेंच्या दादरमधील 'शिवतीर्थ' निवासस्थानी दाखल झाले. ही भेट सुमारे मागील अर्धा तासापासून सुरू आहे. या भेटीचा अधिकृत कार्यक्रम नव्हता, त्यामुळे राजकीय निरीक्षकांना या भेटीमागील उद्देशाबाबत उत्सुकता आहे. संजय राऊत यांच्या उपस्थितीमुळे ही भेट केवळ कौटुंबिक नसून राजकीय असल्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत मुंबईतील राजकीय परिस्थिती, मराठी मतदारांचे एकीकरण आणि आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. तसेच असंही म्हटलं जात आहे की, शिवसेना (UBT) पक्षाच्या दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी देखील उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर गेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा>> ‘ती’ 40 मिनिटं… महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? राज ठाकरे-फडणवीसांची बंद दाराआडची चर्चा अन्..
ही भेट ठाकरे बंधूंची 'शिवतीर्थ'वरील दुसरी भेट आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी भेट घेतली होती, ज्यात दोन्ही नेत्यांनी काही विषयावर चर्चा केली होती. त्या भेटीला कौटुंबिक भेट म्हणून वर्णन करण्यात आले होते, परंतु त्यामुळे मनसे आणि शिवसेना (UBT) यांच्यातील युतीच्या चर्चांना वेग आला होता.
ठाकरे बंधूंच्या राजकीय इतिहासाचे पार्श्वभूमी
2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसे स्थापन केली होती, त्यानंतर दोघांमध्ये राजकीय वैर निर्माण झाले. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांच्या संबंधांत सुधारणा दिसून येत आहे. जुलै 2025 मध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी 'मातोश्री'वर भेट घेतली होती, ज्यात दोघांनी एकत्र फोटोसेशन केले होते. वाढदिवसानिमित्तची ही भेट 20 वर्षांनंतरची पहिली भेट होती आणि त्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.










