Sushilkumar Shinde : कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील नेता ठरवणार!
सुशीलकुमार शिंदे यांची कर्नाटक निरीक्षण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती मुख्यमंत्रीपदीसाठी नाव सुचवणार आहे.
ADVERTISEMENT

who will be next chief minister of karnataka : तब्बल तीन दशकानंतर कर्नाटकात इतिहास घडला. कर्नाटकातील मतदारांनी काँग्रेसला प्रचंड बहुमताचा कौल देत भाजपला सत्तेतून पायउतार केलं. कर्नाटकात मोठी मुसंडी मारत काँग्रेसने सत्ता काबिज केली आहे. 224 पैकी 135 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. या विजयामुळे काँग्रेसमध्ये नवीन उर्जा संचारली असून, मुख्यमंत्री कुणाला करायचे याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.
काँग्रेसकडून कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री पदाचे दोन दावेदार आहेत. एकीकडे कर्नाटक माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारामय्या यांचं नाव आहे, तर दुसरीकडे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचे नाव चर्चेत आहे. आता या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पण, महत्त्वाची बातमी म्हणजे कर्नाटकाचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठीने माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
सुशीलकुमार शिंदेंचा बंगळुरूत मुक्काम
अशातच कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी आणि मुख्यमंत्री पदाचा दावेदार ठरवण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पर्यवेक्षक म्हणून सुशीलकुमार शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा >> संजय राऊत ‘तसं’ बोलून फसले! राणेंसारखी पुन्हा ‘जेल’वारी घडणार?
बंगळूरमध्ये काय आणि कशा पद्धतीने निर्णय होतोय हे पाहून निर्णय घेण्यात येईल. पक्षामध्ये सर्वांशी विचार विनिमय करुन मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यावा लागतो. काँग्रेस हाय कमांडशी बोलून निर्णय घ्यावा लागेल असं सुशीलकुमार शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.










