राष्ट्रपतीपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचे नाव? सर्व कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला रवाना!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ २४ जुलैला संपत आहे. त्यामुळे १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.
Sushilkumar Shinde
Sushilkumar ShindeMumbai Tak

सोलापूर: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ २४ जुलैला संपत आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक (presidential election 2022) होणार आहे तर २१ जुलै रोजी देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. आता याच निवडणुकांच्या दृष्टीने देशात हालचाली सुरु झाल्या आहेत. शरद पवारांनी माघार घेतल्यानंतर पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांच्या नावाची चर्चा होती, परंतु त्यांच्या नावाला जास्त पंसती मिळत नाहीये.

काही दिवसांपुर्वी ममत बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती, त्यामध्ये काँग्रेससह १८ विरोधी पक्ष सहभागी झालेले होते. आता विरोधी पक्षांना उमेदवार देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशातील सर्वच पक्षांची अगदी मैत्रीपुर्ण संबंध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नाव समोर आले आहे. फक्त समोर आले नाहीतर शिंदे पक्षाचा आदेश येताच दिल्लीला रवाना देखील झाले आहेत. सुशीलकुमार शिंदे विरोधी गटातून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरु शकतात अशी चर्चा आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या आजारी असल्याने रुग्णालयात आहेत, त्याचबरोबर राहुल गांधींना सोमवारी पुन्हा ईडी चौकशीला हजर राहायचे आहे, त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबतचा निर्णय युद्धपातळीवरती घ्यायचा आहे. सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या पडत्या काळात अनेक ज्येष्ठ नेते पक्षाला सोडून गेले. परंतु सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे पक्ष न सोडता पक्ष वाढीवर भर देत आहेत, त्यामुळेच काँग्रेसने सुशीलकुमार शिंदेंच्या नावाचा विचार केला आहे.

२००२ मध्ये भैरवसिंह शेखावत यांच्याविरोधात उपराष्ट्रपतीपदासाठी सुशीलकुमार शिंदेंनी अर्ज दाखल केला होता. आपला पराभव निश्चित आहे हे माहित असूनही सुशीलकुमार शिंदेंनी पक्ष आदेश पाळून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता राष्ट्रपतीपदासाठी भाजप जो उमेदवार देईल तोच विजयी होईल अशी शक्यता आहे, परंतु तरीही सुशीलकुमार शिंदेंना पक्षाना बोलावले आहे.

दरम्यान भाजपकडूनही अजून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. भाजपकडून दोन नावं मात्र चर्चेत आहेत. एक म्हणजे झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. आदिवासी समाजाची मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजप द्रौपती मुर्मू यांना आपला उमेदवार म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in