'काही घडलं तर शिंदे-फडणवीस जबाबदार राहतील'; राजन विचारेंचं पोलीस आयुक्तांना पत्र

खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेत कपात; पोलीस आयुक्तांना पाठवलं पत्र
Thackeray group MP Rajan Vichare's security cut, angry Vichare's letter to Police Commissioner
Thackeray group MP Rajan Vichare's security cut, angry Vichare's letter to Police Commissioner

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांना वेगवेगळं नाव आणि पक्षचिन्हही मिळालं आहे. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं आहे आणि मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह मिळालं आहे. अशात ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटामध्ये काहीना काही कारणावरून तू तू, मैं मैं सुरू आहे. काही वेळा आमनसामने येण्याच्या घटना घडल्या आहेत.

खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेत कपात

या सगळ्या घडामोडी घडतना ठाकरे गटातील खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. राजन विचारे यांचे अंगरक्षक आणि पोलीस सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. यामुळे खासदार राजन विचारे यांनी संताप व्यक्त केला असून ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची भेट घेऊन पत्र दिलं आहे. त्यावेळी लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपस्थित होते. कपात केलेले अंगरक्षक पोलीस यांची सुरक्षा पुन्हा देण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

ठाण्यात नरेश म्हस्केंच्या निर्देशांवरून धमक्या?

ठाण्यात शिंदे गटाकडुन शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे, वषानुवर्षे आनंद चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुरु असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जागेवर हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धमक्या देणे. इत्यादी चिथावणीखोर प्रकार तथाकथीत स्वतःला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत असाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची शक्यता शक्यता वर्तवली आहे. तरी सुद्धा आमच्याकडून संयम ठेवलेला आहे. असंही या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान ठाणे लोकसभेचे खासदार म्हणून ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या शहराशी संलग्न असलेला लोकसभा मतदार संघ असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वारंवार रात्री - अपरात्री फिरावे लागते. त्यामुळे नागरिकांशी थेट जनसंपर्कामुळे मतदार संघात सन २०१९ ला लोकसभेच्या निवडणुकीत ७ लाख ४०हजार ९६९ मते मिळून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु शासनाने सूडबुद्धीने त्यांचे अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केल्यामुळे हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो अशी शंका यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

शिंदे गटात ज्यांना शासकीय आणि राजकीय असे कोणतेही उच्च पद नाही त्यांना पोलीस अंगरक्षक पुरविण्यात येतात. परंतु लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी खासदार यांची अंगरक्षक पोलीस सुरक्षा कमी केल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांचे अंगरक्षक पोलीस सुरक्षा पूर्वरत करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तसेच दुर्दैवाने अशी काही दुर्घटना घडल्यास त्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in