राहुल गांधी वीर सावरकरांबाबत योग्यच बोलले, तुषार गांधींचा पाठिंबा

जाणून घ्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या तुषार गांधी यांनी काय म्हटलं आहे?
Tushar Gandhi Said Rahul Gandhi Said Correct Thing About Veer Savarkar
Tushar Gandhi Said Rahul Gandhi Said Correct Thing About Veer Savarkar

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या टीकेनंतर महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे. पुण्यात काँग्रेसने वीर सावरकर माफीवीर असल्याचे पोस्टर लावले त्यानंतर ते वीर सावरकर प्रेमींकडून फाडले गेले. तसंच भाजपकडून राहुल गांधींवर टीकेची झोड उठली आहे. अशात आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधी योग्यच बोलले असं म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत तुषार गांधी?

राहुल गांधी यांनी जे सांगितलं ते सत्यच आहे. कारण विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागून नंतर त्यांच्याकडून पेन्शनही घेतलं होतं. पुढच्या काळात त्यांनी ब्रिटिशांसाठी कामही केलं होतं. त्यामुळे सत्य सांगायला जर आपण घाबरलो तर आपण त्या सत्याशी दगाबाजी करतो आहोत. असं म्हणत तुषार गांधी यांनी राहुल गांधीचं वक्तव्य योग्यच आहे असं म्हटलं आहे. तुषार गांधी हे आज राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

आणखी काय म्हणाले तुषार गांधी?

मी कित्येक दिवसांपासून भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा विचार करत होतो. जे पुरोगामी विचारांचे लोक आहेत त्यांनी या यात्रेत सहभागी होणं गरजेचं आहे. शेगावमध्ये ही यात्रा येत आहे, असं कळताच मी या यात्रेत येण्याचा निर्णय घेतला. कारण हे माझं जन्मस्थळ आहे, असंही तुषार गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

राहुल गांधी यांनी हिंगोलीतल्या सभेत वीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केला. एवढंच नाही तर वीर सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली असा दावा केला. तसंच गुरूवारी त्यांनी एकत्र पत्रही दाखवलं त्यामध्ये त्यांनी वीर सावरकर यांनी नेमका काय उल्लेख केला होता ते वाचून दाखवलं. त्यावरून आता महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे.

रणजीत सावरकरांनी राहुल गांधींवर काय केले आरोप?

"वीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांच्या आदेशानुसार हिंदुस्थानविरुद्ध काम करीत होते, अशी धादांत खोटी विधाने करत सावरकरांसारख्या थोर राष्ट्रपुरूषाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करून खटला दाखल करावा, अशी विनंती करत आहे", असं रणजित सावरकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

"ही बातमी मी माझ्या दादर येथील निवासस्थानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवर पाहिली. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील आज सकाळी (१७ नोव्हेंबर) असेच व्यक्तव्य करून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला आहे. हे वृत्त मी दूरदर्शनवर पाहिलं", असंही रणजित सावरकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in