महाराष्ट्राचे दोन वाघ गुजरातला जाणार; बदल्यात दोन सिंह येणार : सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार हे सोमवारी एकदिवसीय गुजरात दौऱ्यावर गेले होते.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Mumbai Tak

मुंबई : गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या सिंहाची जोडी (नर आणि मादी) मुंबईमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात उद्यानातील वाघाची जोडी (नर आणि मादी ) जुनागढला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.

यासाठी दोन्ही राज्यांमध्ये करार झाला असून केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचेही यावेळी ठरले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

वाघ गुजरातला देण्याचे आणि बदल्यात सिंह घेण्याच्या प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) सुनील लिमये आणि जुनागढ येथील सक्कबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. त्यानंतर नुकतेच गुजरात दौऱ्यावर गेल्यानंतर सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्यात या कराराबद्दल सोमवारी अहमदाबाद येथे चर्चा झाली.

सुधीर मुनगंटीवार गुजरात दौऱ्यावर :

सुधीर मुनगंटीवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे सोमवारी एकदिवसीय गुजरात दौऱ्यावर गेले होते. फॉक्सकॉन-वेदांता यांचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतरित झाल्यानंतर टीकेचे धनी झालेले शिंदे सरकार गुजरातच्या औद्योगिक धोरणांचा अभ्यास करणार आहे. यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेमध्ये एक शिष्टमंडळ एकदिवसीय गुजरात दौऱ्यावर रवाना झाले होते.

या शिष्टमंडळात उदय सामंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव विकास खरगे आणि काही इतर सचिव, अधिकाऱ्याचा समावेश होता. गुजरातच्या औद्योगिक सेन्ट्रलाईज्ड सिस्टीमचा आणि गुजरातच्या एकूणच औद्योगिक धोरणांचा अभ्यास करणे, गुजरातमधील उद्योगांसाठी असलेल्या इतर सोई सुविधांचाही आढावा घेणे अशा काही प्रमुख गोष्टींचे उद्दिष्ट्य या दौऱ्याचे ठेवण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in