‘महाराष्ट्राच्या नशिबी नपुंसक सरकार’; उद्धव ठाकरेंनी शिंदेंसह मोदींनाही सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वेदांता फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रोजेक्ट पाठोपाठ टाटा एअरबस प्रोजेक्टही गुजरातमध्ये होत आहे. हे प्रोजेक्ट महाराष्ट्रात येऊ घातले होते, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. यावरूनच राजकीय रणकंदन सुरू असून, आता उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून शिंदेंच्या सरकारला नपुंसक सरकार संबोधत मोदींवरही टीकास्त्र डागलंय.

महाराष्ट्रातून गुजरातेत गेलेल्या प्रकल्पाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे आणि मोदी-शाह यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय.

सामना अग्रलेखात म्हटलंय की, “महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आले आहे व महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक असे उद्योग पळविले जात आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारखा महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. हा प्रकल्प पेंद्राने गुजरातकडे खेचून नेला. टाटा एअरबस हा बावीस हजार कोटींचा प्रकल्प ‘किडनॅप’ करून गुजरातेत नेल्याने महाराष्ट्रावर मोठाच आघात झाला आहे. महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून चार मोठे औद्योगिक प्रकल्प गुजरातेत गेले. हे प्रकल्प कर्नाटकात, आंध्रात, उत्तर प्रदेशात, बिहारात गेले नाहीत. ते मागास छत्तीसगड पिंवा झारखंड राज्यात गेले नाहीत. ते प्रकल्प ठरवून मोदी-शहांच्या गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत व त्या ‘किडनॅपिंग’वर राज्याचे मिंधे मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत”, असं टीकास्त्र ठाकरेंनी सामना अग्रलेखातून डागलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“महाराष्ट्राला कंगाल बनविण्यासाठी व राज्याचा स्वाभिमान, अस्मिता खतम करण्यासाठीच महाराष्ट्रात मिंधे सरकार स्थापन झाले हे आता नक्की झाले. टाटा यांनी आजपर्यंत त्यांच्या सर्व प्रकल्पांसाठी महाराष्ट्राला प्राधान्य दिले. वेदांता फॉक्सकॉनने तर महाराष्ट्रात पायाभरणी करण्याची सर्व जय्यत तयारी केली होती, पण केसाने गळा कापावा तसे महाराष्ट्राच्या बाबतीत घडले”, असंही सामना अग्रेलखात म्हटलं आहे.

“महाराष्ट्राला एक उद्योगमंत्री आहेत, ते काय करीत आहेत? तर स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी प्रकल्पांचे अपहरण झाल्याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडून जबाबदारी झटकत आहेत. अरे बाबा, तुझ्या त्या मिंध्या मुख्यमंत्र्याने हिंदुत्व, स्वाभिमान, महाराष्ट्राचे कल्याण वगैरे शब्दांचे बुडबुडे फोडत एक सरकार बनवले ना? मग आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर का फोडतोस? पुन्हा काय, तर या प्रकल्पांबाबत ‘श्वेतपत्रिका’ काढू, असेही या महाशयांनी मंगळवारी जाहीर केले. अशा पत्रिका काढण्यापेक्षा महाराष्ट्रातले प्रकल्प पळवून नेले म्हणून दिल्लीत जाऊन थयथयाट करा. तुमच्या चाळीस खोकेबाज आमदारांचा महाराष्ट्र स्वाभिमान किती प्रखर आहे हे दाखविण्यासाठी गुजरातेत जाऊन तांडव करा, नाही तर शिवरायांचे नाव घेण्याचा नादानपणा करू नका”, असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंतांवरही टीकेचे बाण डागण्यात आलेत.

ADVERTISEMENT

“लवकरच मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत, असे मटक्याचे आकडे लावले जात आहेत. हे आधी बंद करा आणि लाखो रोजगार पळवून नेणाऱ्या मोदी-शहांना खडसावून जाब विचारण्याची हिंमत दाखवा. गुजरातच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्र महाराष्ट्रावर हल्ले करीत आहे. महाराष्ट्राच्या पोटावर सरळ सरळ लाथ मारण्याचाच हा प्रकार आहे. महाराष्ट्राची लूट करून गुजरातला मालामाल करण्याच्या बोलीवरच दिल्लीश्वरांनी मिंधे महाशयांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलेले दिसते”, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आलीये.

ADVERTISEMENT

मोदी-शाहांच्या धोरणावर टीकास्त्र; ठाकरेंनी सामनात काय म्हटलंय?

“संरक्षण खात्याचे प्रकल्प असोत पिंवा इतर उद्योग, प्रत्येक गुंतवणूक आपल्याच गृहराज्यात नेण्याचा मोदी-शहांचा अट्टहास ‘राष्ट्रीय’ बाण्यास धक्का देणारा आहे. मुंबईचे महत्त्व त्यांना कमी करायचेच आहे, पण आता त्यांची वाकडी नजर महाराष्ट्राकडे गेली आहे. महाराष्ट्र आपल्या पायावर आणि हिमतीवर उभा आहे व राहील; पण इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर ‘सबका साथ, सबका विकास’ या मोदी घोषणेतील फोलपणा समोर येतोय”, अशा शब्दात मोदी-शाहांच्या धोरणांवर टीका करण्यात आलीये.

“गुजरातचा विकास आणि सारा देश भकास अशी नवी घोषणा आता द्यावी लागेल. रुपयातील 80 पैसे गुजरातला व 20 पैशांत सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही? तेही करा, कारण आजही गुजरातच्या पलीकडे सध्याच्या दिल्लीश्वरांची झेप जात नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नरसिंह राव, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेत्यांच्या दूरदृष्टीचे महत्त्व अशा घोर काळी पटते. एका विशाल दृष्टिकोनातून या नेत्यांनी विचार केला म्हणून हे राष्ट्र घडले व टिकले. त्या राष्ट्रास आज सुरुंग लागत आहे”, असं म्हणत सामनातून केंद्रातल्या मोदी सरकारला खडेबोल सुनावण्यात आलेत.

“मिंध्यांपासून महाराष्ट्राला वाचवा”

“महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील घाव आहे. महाराष्ट्राच्या इज्जतीचे अपहरण हे राष्ट्रीय अस्मितेचे वस्त्रहरण आहे, पण आपले मिंधे मुख्यमंत्री निर्विकारपणे सांगतात, ‘‘भाजप सोबत आल्याने मी आज समाधानी आहे.’’ छान! महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे सेनापती बापट का सांगून गेले ते आता स्पष्ट झाले. मिंध्यांपासून महाराष्ट्राला वाचवा”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सामना अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आलाय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT