शिंदे बंडानंतर ठाकरे पहिल्यांदा मुंबईबाहेर; थेट औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार

रविवारी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayफोटो सौजन्य - CMO Maharashtra

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबईबाहेर जाणार आहेत. उद्या (रविवार) उद्धव ठाकरे औरंगाबादला भेट देणार आहेत. मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत कशी करता येईल याबाबतच्या चर्चेसाठी ते एकदिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर :

मराठवाड्यात 15 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेलं पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून, वाहून गेलं आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. तरीही राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या रविवार दिनांक 23 ऑक्टोबर 22 रोजी संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार आहेत . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार आहेत, अशी माहिती शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने देण्यात आली आहे.

नुकसान भरपाईसाठी विरोधक आक्रमक :

दरम्यान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी राज्यात तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. सोबतच राज्यातील विविध प्रश्नांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच अतिवृष्टीमुळे आणि पूरसदृश्य परिस्थितीमुळे शेती आणि इतर मालमत्तेचे मोठं नुकसान झाल्यानं एनडीआरएफ आणि एसडीआरएफ निकषाच्या बाहेर जाऊन मदत करावी अशी मागणी पवार यांनी केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in