उद्धव ठाकरे कारच्या बोनेटवर उभं राहून दसरा मेळावा संबोधित करणार? या फोटोमुळे चर्चा

बाळासाहेब ठाकरे यांची पुनरावृत्ती उद्धव ठाकरे करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत
Uddhav Thackeray will stand on the bonnet of the car and address the Dussehra Melava? Discussion because of this photo
Uddhav Thackeray will stand on the bonnet of the car and address the Dussehra Melava? Discussion because of this photo

शिवसेनेचा दसरा मेळावा जितका चर्चेत आहे. तितकीच चर्चा आहे ती बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची. ज्यात बाळासाहेब कारच्या बोनेटवर उभं राहून भाषण देत असल्याचं दिसतंय. 60 च्या दशकात बाळासाहेबांनी फियाट गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण केलं होतं. आता याच्याशी दसरा मेळाव्याचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

बाळासाहेब ठाकरेंचा तो फोटो व्हायरल

तर त्याचं कारण आहे ते म्हणजे दसरा मेळाव्याबाबत असलेली अनिश्चिचता. त्याचं असं आहे की एकीकडे शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही आणि शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार ही चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मुंबई महापालिकेने शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली.

ठाकरे आणि शिंदे गटाच्या याचिकांवर २३ सप्टेंबरला सुनावणी

ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाच्या याचिकांवर बॉम्बे हायकोर्टात 23 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्कऐवजी इतर कोणत्या मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाची तयारी सध्या तरी दिसत नाही. शिंदे गटाला बीकेसी ग्राउंडवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र ठाकरे गटाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. इथे तर दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलाय. मग अशा परिस्थितीत सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरानी शेअर केलाय.

किशोरी पेडणेकर यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

यात पेडणेकर लिहितात ‘आतुरता दसरा मेळाव्याची... पुनरावृत्ती होणार ’ याबरोबरच बाळासाहेबांचा बोनेटवर उभं राहून भाषण करत असतानाचा फोटो ट्विट केलाय.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाला परवानगी मिळाली नाही, तरी बाळासाहेबांप्रमाणे गाडीच्या बोनेटवर उभं राहून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दसऱ्या दिवशी भाषण करतील असं या ट्विटमधून पेडणेकरांना सुचवायचं आहे का?

तसं असेल तर सभेला परवानगी मिळाली नाही तर उद्धव ठाकरे अशाच पद्धतीने गाडीच्या बोनेटवर उभं राहून सभा घेताना दिसतील आणि हीच शिवसेनेची स्ट्रॅटेजी आहे? याचं उत्तर येत्या काही दिवसात मिळणार आहे.

२१ जूनला शिवसेना दुभंगली

२१ जून २०२२ हाच तो दिवस होता ज्यादिवशी एकनाथ शिंदे यांनी बंड करत ४० आमदारांना सोबत घेतलं. शिवसेना दुभंगली ती याच दिवसापासून. अशात शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे काय झालं ते महाराष्ट्राने पाहिलं आहेच. अशा सगळ्यात आता दसरा मेळाव्यावरून शिंदे विरूद्ध ठाकरे असा पेच निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे हे दसरा मेळावाही हिरावून घेण्याच्या तयारीत आहेत हे दिसतंच आहे. आता नक्की काय होणार ते पाहता येईल मात्र सध्या या फोटोची चर्चा रंगली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in