राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय झाली चर्चा? बाळा नांदगावकरांनी दिलं उत्तर..

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. मनसेला कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार का? राजू पाटील हे मंत्रिमंडळात असणार का? महापालिका निवडणुकांसाठी भाजप-मनसे एकत्र येणार का? जर एकनाथ शिंदे यांच्यासह सगळ्या आमदारांना वेगळ्या पक्षात जावं लागलं तर तो पर्याय मनसेचा असेल का? या सगळ्यावर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली का? अशा चर्चा रंगल्या. मात्र बाळा नांदगावकर यांनी या प्रकरणी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar)?

“मध्यंतरी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहलं होतं. पत्र लिहिल्यानंतर ते पत्र देवेंद्र फडणवीस यांना ते पत्र आवडलं होतं. त्यावेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं फोनवरून बोलणं झालं होतं. त्याचवेळी फडणवीस यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला भेटायला येणार आहे. त्यानुसार ते आज राज ठाकरे यांना भेटायला आले होते. त्यांनी राज ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्यासोबत मी, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे होतो. त्यानंतर या दोघांमध्ये सुमारे सव्वा तास चर्चा झाली. ती काय ते आम्हाला समजलेलं नाही.”

ही चर्चा बंद खोलीतल्या चर्चेसारखी होती का?

या प्रश्नावर बाळा नांदगावकर म्हणाले की राज ठाकरे जे काही करतात ते खुलेपणाने करतात. ते काही लपवून ठेवत नाहीत. मात्र आत्ता या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते अजून समजू शकलेलं नाही. या दोघांची मैत्री बरीच पूर्वीपासून आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी काही अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर राज्याला एका स्थिर सरकारची गरज होती. त्यासाठी जी मोहीम झाली त्यात राज ठाकरे यांनी भाजपला जिथे आवश्यक आहे तिथे मदत केली हे सगळं तुम्हीही पाहिलं आहेच असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्यासह जो आमदारांचा गट शिवसेनेतून बाहेर आला आहे त्या गटासाठी मनसेचा पर्याय असू शकतो का?

हा प्रश्न विचारला असता बाळा नांदगावकर म्हणाले की हा जर-तरचा विषय आहे. कोर्टात विषय आहे. कुणी वकील सकारात्मक किंवा काहीजण नकारात्मक बोलतात. या सगळ्यावर पुढे काय घडतं ते पाहू. शिंदे सरकारमध्ये मनसेचा सहभाग असणार का? या प्रश्नावर बाळा नांदगावकर म्हणाले की, मला वाटतं की मनसेने सहभागी असण्याचा काही प्रश्न येत नाही. आम्ही कुठल्याही मोबदल्यात कुठलीही मदत करत नाही. अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार ही जी बातमी चालवली गेली ती बातमी अत्यंत खोडसाळपणाची होती हे राज ठाकरे यांनीच सांगितलं. सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रश्न येत नाही. मात्र दोन नेत्यांमध्ये याबाबत काही चर्चा झाली असेल तर मला त्याची कल्पना नाही असंही त्यांनी सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT