
शिवसेनेत बंडाची ठिणगी कधी पडली या प्रश्नाचं उत्तर बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलं आहे. शिवसेनेत जे अभूतपूर्व बंड झालं त्यामुळे शिवसेना दुभंगली. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या उद्धव ठाकरेंना पायऊतार व्हावं लागलं. त्यानंतर भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार अंतर्विरोधाने पडेल असं देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यंत वारंवार सांगितलं होतं. त्यानंतर बंडाची ठिणगी शिवसेनेत पडली. पुढे काय झालं ते महाराष्ट्राने पाहिलं आहेच.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार गेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे शहाजी बापू पाटील. काय डोंगर, काय झाडी, काय हाटेल Ok मधे आहे आहे सगळं या फोन कॉलमुळे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले आणि महाराष्ट्राला माहित झालेले आमदार म्हणून बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा लौकिक आहे. त्यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात उपस्थिती लावत बंडाचं कारण काय? पहिली ठिणगी कशी पडली ते सांगितलं आहे.
"महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग हा महाराष्ट्राच्या इतिहासातला वेगळा प्रयोग होता. मात्र या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतानाच शिवसेनेत बंडाची पेरणी झाली. कुणालाही हे आवडलं नव्हतं. तिथे कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर घराकडे जाईपर्यंत फोन आला. त्यानंतर इकडून तिकडे नेण्यात आलं. कोणी काही बोललं नाही. उद्धव ठाकरे आले की पाच-सहा मिनिटं बोलायचे. त्यानंतर पु्न्हा निघून जायचे. ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्याच सोबत बसायचं? हीच माणसं आता सत्तेत आल्यानंतर आपली कामं कशी काय होणार? शिवसेनेच्या ५५ पैकी ५० आमदारांना हे आवडलं नव्हतं" असं शहाजीबापूंनी सांगितलं.
या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंना लांब बसवण्यात आलं होतं. आदित्य ठाकरेंना जवळ बसवलं गेलं होतं. एकनाथ शिंदे गटनेते आहेत, त्यांना जवळ बसवायला हवं होतं. मात्र त्यांना कोपऱ्यात बसवलं गेलं. बाहेर आल्यानंतर आम्ही शिंदे यांना म्हटलं की साहेब आम्हाला खूप वाटा आहेत. काय करायचं पक्ष सोडायचा का? हे वागणं आम्हाला नवं नाही. तुम्ही निर्णय घ्या असं त्यांना सांगितलं शिवसेनेतल्या बंडखोरीला तिथूनच सुरूवात झाली. असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं आहे.