Andheri Bypoll: भाजपला माघार घेण्यासाठी मागच्या दाराने विनंती कुणी केली? फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

जाणून घ्या अंधेरीच्या पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना मागच्या दारानेही विनंती केली गेली आहे
Who asked BJP to withdraw from the back door in Andheri By Election? Devendra  Fadnavis' statement in discussion
Who asked BJP to withdraw from the back door in Andheri By Election? Devendra Fadnavis' statement in discussion

अंधेरीच्या पोटनिवडणुकीत आम्हाला विजयाची पूर्ण खात्री होती. अंधेरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात बराच विचार झाला. कार्यकर्त्यांचं मत होतं की आम्ही निवडणूक लढवली पाहिजे. मुंबई युनिटचंही मत होतं की आम्ही निवडणूक लढवली पाहिजे. मुरजी पटेलांसारखा उमेदवार ज्याने अपक्ष म्हणूनही ४५ हजार मतं घेतली तोच उमेदवार आम्ही उभा केला होता त्यामुळे आम्हाला निवडणून येण्याची पूर्ण खात्री होती. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी पोटनिवडणुकीत माघार का घेतली त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काही लोकांनी समोरून तर काहींनी मागून विनंती केली

काही ज्येष्ठ लोकांनी विनंती केली. आपल्यालाही कल्पना आहे की राज ठाकरे, शरद पवार अशा लोकांनी विनंती केली. काही लोकांनी समोरून विनंती केली. काही लोकांनी मागून विनंती केली. मागून विनंती कुणी केली? विचारू नका राजकारणात सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पण ज्यांनी कुणी विनंती केली त्यावर विचार करून मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, आमच्या वरिष्ठांशी बोललो. आमच्या टीमशी बोललो. या चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा अंगुलीनिर्देश कुणाकडे?

देवेंद्र फडणवीस यांनी हे जे वक्तव्य केलं आहे ते चांगलंच चर्चेत आहे याचं महत्त्वाचं कारण हे आहे की देवेंद्र फडणवीस यांना मागच्या दाराने कुणी विनंती केली? याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. मागच्या दाराने विनंती जी केली गेली ती ब्रांद्र्याहून केली गेली का? असाही प्रश्न एका पत्रकाराने विचारला त्यावर तुम्हाला काही सांगणंच गैर आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस सूचक हसले. त्यांचा नेमका अंगुलीनिर्देश कुणाकडे आहे? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

भाजपने माघार घेण्याची ही पहिली वेळ नाही

आर आर पाटील वारले तेव्हाही असाच निर्णय घेतला होता. पतंगराव कदम गेले तेव्हाही असाच निर्णय घेतला होता. काही लोक छोट्या मनाचे असतात तुम्ही कसाही निर्णय घेतला तरीही ते बोलत असतात. मात्र अशा लोकांना उत्तर ग्रामपंचायतीच्या निकालांनीच दिलं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

होय आमच्या निर्णयामुळे कार्यकर्ते नाराज झाले

या निर्णयामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले. कारण ते लढण्याच्या तयारीत आहे. नेते म्हणून आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात. प्रसंगी कार्यकर्त्यांची नाराजीही पत्करूनही असे निर्णय घ्यावे लागतात असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in