शिवसेना- संभाजी ब्रिगेडच्या युतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हसू अनावर; म्हणाले,...

युतीबद्दल समाजामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत याची प्रचिती पुढे येणाऱ्या काळात दिसून येईल, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
Cm eknath shinde on sambhaji briged and shivsena alliance
Cm eknath shinde on sambhaji briged and shivsena alliance

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून उद्धव ठाकरे जास्त सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची पुनर्बांधणी करण्याचं काम सूरू आहे. अशातच एक राजकीय घटना घडली. शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युती केली. शुक्रवारी (२६ ऑगस्ट) उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी एकत्र येत ही घोषणा केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून नव्या युतीबद्दल प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीबद्दल बोलताना शिंदेंना मात्र हसू अनावर झालं.

संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीच्या प्रश्नावर का हसले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी सातारा दौऱ्यावर होते. उशिरा रात्री त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. दरम्यान, जेव्हा पत्रकारांनी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीवर प्रश्न विचारताच उत्तर देताना हसून सुरुवात केली. शिंदे म्हणाले, "बाळासाहेबांचे विचार पुसण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्या विचाराची प्रतारणा करण्यात आली म्हणून तर आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकशाहीत कोणी कोणाशी युती करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु या युतीबद्दल समाजामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. याची प्रचिती पुढे येणाऱ्या काळात दिसून येईल", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

युतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा पत्रकारांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर प्रश्न विचारला असता, त्यांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली. या प्रश्नावर त्यांनी फक्त 'विनाश काले विपरीत बुद्धी', अशी प्रतिक्रिया देत खोचक टोला लगावला. आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युती आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात किती प्रभाव टाकणार, हे येणारा काळात दिसेल. पण, या युतीमुळं शिंदे गट आणि भाजपला काय नुकसान होणार, हेही पाहणं गरजेचं असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील युतीबाबत काय म्हणाले?

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाली याबाबतीत आमच्या सोबत चर्चा नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. चर्चा जरी झाली नसली तरी ज्या अर्थी संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत आहे, त्याअर्थी त्यांना जर महाविकास आघाडीत यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे, असं देखील जयंत पाटील म्हणालेत.

'शिवसेना-संभाजी ब्रिगेड सर्व निवडणुका एकत्र लढवणार'

"महाराष्ट्राचं हित साधण्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीचा निर्णय घेतला आहे. देशात विषमतावादी व्यवस्था निर्माण झाली आहे. संविधान धोक्यात आलं आहे. त्याला सुरक्षित करायचं असेल, संरक्षण द्यायचं असेल, तर पुरोगामी संघटनांनी एकत्र यायला हवं. भविष्य काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून सर्व निवडणुकात शिवसेनेसोबत असू", असं संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in