
आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) साठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. स्टार फलंदाज विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुलसारखे क्रिकेटपटू 15 सदस्यीय संघात परतले आहेत. परंतु वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. जसप्रीत बुमराहची एक्झिट हा मोठा धक्का मानला जात आहे कारण तो सध्या भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर हर्षल पटेल देखील दुखपतग्रस्त झाल्यामुळे त्याची निवड हुकलेली आहे.
बुमराहच्या बाहेर पडल्यानंतर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चर्चेचा विषय राहिला आहे. बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे निवडीसाठी अनुपलब्ध होते, तर मोहम्मद शमीसारख्या अनुभवी खेळाडूचा संघात समावेश का करण्यात आला नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संघातील खेळाडूंची निवड पाहता भारतीय निवडकर्त्यांनी फक्त तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली ज्यात भुवनेश्वर कुमार अनुभवी आहे. मात्र, भुवीचा फिटनेस कधी फसेल हे सांगता येत नाही. आकड्यांवर नजर टाकली तर दुखापतींमुळे भुवीच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झालेला आहे. हर्षल पटेलने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे.
भुवनेश्वर व्यतिरिक्त अर्शदीप सिंग, आवेश खान या दोन स्पेशालिस्ट गोलंदाजांना तेवढा अनुभव नाही. नुकत्याच झालेल्या विंडीज दौऱ्यात आवेश खान चांगलाच महागात पडला होता. दुसऱ्या T20 सामन्यात, दबावाच्या परिस्थितीत आवेश शेवटच्या षटकात नो-बॉल टाकत होता आणि त्याचा फटका भारताला सहन करावा लागला. अशा परिस्थितीत निवडकर्त्यांना आवेशच्या जागी मोहम्मद शमीला ठेवता आले असते कारण आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धेत अनुभव खूप उपयोगी पडतो.
आवेश खानला संघात ठेवायचे होते तर फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या जागी मोहम्मद शमीची निवड करता आली असती. रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल हे फिरकीपटू असताना रवी बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमध्ये का?. संघात चार फिरकीपटूंचा समावेश हाही आश्चर्यकारक निर्णय मानला जात आहे.
31 वर्षीय मोहम्मद शमी फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. तसेच, त्याने आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्ससाठी चांगली कामगिरी केली होती. एक गोष्ट निश्चितपणे शमीच्या विरोधात जाते ती म्हणजे गेल्या विश्वचषकानंतर त्याने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतलेला नाही. पण मोठ्या स्पर्धांमध्ये शमीसारख्या अनुभवी गोलंदाजाचा अभाव संघाला त्रासदायक ठरु शकतो.
27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत UAE मध्ये होणाऱ्या आशिया कप 2022 मध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी श्रीलंका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान याआधीच पात्र ठरले आहेत. त्याचवेळी पात्रता स्पर्धेनंतर सहावा आणि अंतिम संघ निश्चित केला जाईल. टीम इंडिया 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध दोन हात करणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.