विराट कोहलीला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आलीये का?

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळला जात आहे.
विराट कोहलीला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आलीये का?

गेली १० वर्ष जागतीक क्रिकेटवरती आपल्या फलंदाजीने अधिराज्य गाजवणाऱ्या आणि भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) किंग कोहली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटच्या आयुष्यात मागच्या तीन वर्षांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. मागच्या तीन वर्षातील विराट कोहलीच्या (Virat Kohli) कहाणीवरती नजर टाकली तर ती मावळणाऱ्या सुर्यासारखी आहे. जो विराट कोहली शतकांमागून शतकं करत होता त्याला गेल्या तीन वर्षांपासून मोठी धावसंख्या करण्यासाठी झगडावं लागत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळला जात आहे. गेल्या वर्षी जेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडत होता, तेव्हा भारताने इंग्लंडचा दौरा केला होता. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चार सामन्यांसह भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आणि इतिहास घडवला.

टीम इंडियाच्या विजयी रथावर कोरोनाने (Corona) लगाम घातला आणि सामना एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला. आता जेव्हा कसोटी एजबॅस्टनमध्ये होत आहे, त्याआधी विराट कोहलीचे चाहते पूर्ण जोमात होते. 2018 च्या इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीचा जो धडाकेबाज फॉर्म पाहायला मिळाला होता, तोच फॉर्म इथेही पाहायला मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण तसे झाले नाही, एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात 11 धावा आणि दुसऱ्या डावात 20 धावा करणाऱ्या विराट कोहलीने सर्व आशा धुडकावून लावल्या.

विराट कोहलीचा हा बॅड पॅच बराच काळ सुरू आहे, तीन वर्षांपासून एकही शतक विराटने केलेले नाही. पण आता समस्या शतकाची नाही, तर समस्या आहे ती मोठ्या खेळीची. अशा परिस्थितीत विराट कोहलीला प्लेइंग-11 मध्ये ठेवावे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

नावाच्या जोरावरच संघात किती काळ जागा मिळणार?

विराट कोहलीने शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक 2019 मध्ये ठोकले होते, त्यानंतर कोरोनाचा काळ आला. तोही आता संपला आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे सामान्य झाले आहे, पण विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक निघालेले नाही. अखेरच्या शतकापासून ते आतापर्यंत विराट कोहलीने एकूण 75 आंतरराष्ट्रीय डाव खेळले आहेत. विराट कोहलीची एकूण सरासरी (कसोटी, एकदिवसीय आणि T20 सह) सुमारे 36 आहे. सध्याच्या क्रिकेटमधे विराट कोहली महान फलंदाजांपैकी एक आहे, परंतु कोहलीची ही सरासरी अनेकांना निराश करणारी आहे.

6 डिसेंबर 2019 पासून विराट कोहलीने एकूण 65 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 75 डावांमध्ये त्याच्या नावावर 2509 धावा आहेत. जे कोणत्याही भारतीय फलंदाजासाठी सर्वाधिक आहे, विराटने या कालावधीत 24 अर्धशतके केली आहेत. त्याची सरासरी 36.89 आहे, तो 8 वेळा आउट झाला आहे. विराट कोहलीशिवाय या संपूर्ण कार्यकाळात रोहित शर्माने 4, केएल राहुलने 5 शतके झळकावली आहेत.

रहाणे आणि पुजाराची चर्चा मग कोहलीची का नाही?

भारतीय कसोटी संघातील दोन वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना काही काळापूर्वी संघातून वगळण्यात आले होते. दोघेही खराब फॉर्मशी झुंज देत होते, पुजाराने 50 डावात एकही शतक झळकावले नाही आणि अजिंक्य रहाणेही दोन वर्षांपासून त्याची वाट पाहत होता. बॅड पॅच मोठा होता आणि दोघांनाही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले होते.

अजिंक्य रहाणे आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झाल्याने तो संघात येऊ शकला नाही. मात्र, त्याला संधी मिळेलच याची शाश्वती नव्हती. दुसरीकडे, संघात पुनरागमन करण्यासाठी चेतेश्वर पुजाराला काउंटीमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागले. त्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीत संघात घेण्यात आले, या कसोटीच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारानेही अर्धशतक झळकावले.

खराब फॉर्मच्या जोरावर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना डावलले जाऊ शकते, तर विराट कोहलीसाठी वेगळे स्केल का? खरं आहे की विराट कोहली हा विक्रम मोडणारा फलंदाज, संघाचा माजी कर्णधार आणि सर्वात मोठ्या फलंदाजांपैकी एक आहे. पण फॉर्म आणि धावा हा निकष असेल तर तो सर्वांसाठी सारखाच असायला हवा. संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते एवढ्या मोठ्या आणि कठोर निर्णयासाठी स्वत:ला तयार करतात का, हे पाहणे बाकी आहे. की अशी परिस्थिती येण्याआधी विराट कोहलीची बॅट पेटते का? हे ही पाहावं लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in